शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2015 (10:52 IST)

आता मनाप्रमाणे बदलणार टीव्ही चॅनल

बसल्या जागेवरून टीव्ही चॅनेल बदलता यावे, यासाठी रिमोट कंट्रोलची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर, काही टीव्ही कंपन्यांनी स्मार्टफोनचा वापर रिमोटसारखा करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते. मात्र, आता नवीन संशोधनामुळे चक्क रिमोटच कालबाह्य ठरणार आहे. मेंदूतील तरंगलहरी वाचून त्यानुसार आपल्या मनातील टीव्ही चॅनेल प्रत्यक्ष टीव्हीवर दिसण्याचे तंत्रज्ञान ब्रिटनमधील संशोधकांनी विकसित केले आहे.
 
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीने (बीबीसी) या संशोधनासाठी पुढाकार घेतला असून ब्रिटनमधील ‘धिस प्लेस’ या स्टुडिओच्या मदतीने मनाप्रमाणे नियंत्रित होणार्‍या टीव्हीचे प्रारूप विकसित केले आहे. यासाठी बीबीसीने मेंदूलहरी वाचू शकणार्‍या हेडसेटची मदत घेतली. हा हेडसेट लावलेल्या युजरनी बीबीसी आयप्लेअरमधील यादी टीव्हीवर ओपन करून त्यातील एखादा चॅनेल किंवा विशिष्ट कार्यक्रम मनात धरल्यास तो टीव्हीवर सुरू होऊ शकेल. या तंत्रज्ञानाची प्राथमिक चाचणी बीबीसीने आपल्याच दहा कर्मचार्‍यांवर केली. विशेष म्हणजे, या दहाही जणांच्या बाबतीत मनातील कार्यक्रम टीव्हीवर सुरू होण्याचा प्रयोग यशस्वी ठरला. शारीरिक व्यंग, तसेच पक्षाघातासारखे आजार असलेल्या व्यक्तींना आपल्या मनाप्रमाणे टीव्ही कार्यक्रम पाहता यावेत, यासाठी हे तंत्रज्ञान विलक्षण उपयुक्त ठरणार आहे. इलेक्ट्रॉन एन्सेफॅलोग्राफी (ईईजी) या तंत्रज्ञानाचा वापर हेडसेटमध्ये करण्यात आला आहे. हा हेडसेट लावलेल्या युजरच्या कपाळावर एक सेन्सर असेल, जो टीव्हीच्या दिशेने बसवलेला असेल व दुसरा सेन्सर हा कानावर लावलेल्या क्लिपमध्ये असेल. कानावरील सेन्सरद्वारे युजरच्या मेंदूतील तरंगलहरी वाचून ते संदेश कपाळावरील सेन्सरकडे पाठवले जातील. त्यानंतर कपाळावरील सेन्सर टीव्हीकडे हे संदेश पाठवून त्यानुसार चॅनेल बदलू शकेल. प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे.