शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By

कान टोचण्याचा जन्म

आजकाल मुलींच्याच नव्हे, तर काही मुलांच्या कानातही आभूषणे लोंबताना दिसू लागली आहेत, पण ही आभूषणांची हौस भागवायची, तर ती अडकवण्यासाठी म्हणून कानाच्या पाळीला भोक पाडलेले असावे लागते. अर्थात, चापचीही आभूषणे मिळतात, पण चापची सुविधा असलेली आभूषणे फारच कमी प्रकारात आढळतात. त्यामुळे कान टोचण्याची गरजच वाटते, पण मुळात कान टोचायच्या पध्दतीचा प्रारंभ तरी कधी झाला असेल, हे पाहायला गेले तर असे आढळते की, या प्रथेला फार पूर्वी म्हणजे इतिहासपूर्व काळातच सुरुवात झाली. प्राचीन काळात इस्ट इंडियन्स, पर्शियन्स, इजिप्शियन्स, तसेच हिब्रू लोक कानात आभूषणे घालत असत. या आभूषणांत विविधता, सौंदर्यपूर्णता, कलाकुसर या गोष्टींचा समावेश होऊन त्यांना कलापूर्ण दागिन्यांचे स्वरूपही फार प्राचीन काळीच प्राप्त झाले. उदाहरणार्थ इट्रस्कन्स सोन्याची जी कर्णभूषणे बनवीत आणि ती त्यांच्या देव-देवतांच्या पुतळय़ांनाही घालत असत. त्या काळात ग्रीक पुरुषही कर्णभूषणे घालत. प्राचीन रोमन लोकांनी या बाबतीत ग्रिकांचीच री ओढली. अनेक रोमन स्त्रियांकडे मोती, तसेच रत्नजडवलेली अतिशय महाग अशी कर्णभूषणे असत. 
 
रोमन पुरुषांनी ही कर्णभूषणे घालण्यासाठी कान टोचायला प्रारंभ केला व ही पध्दत इतकी लोकप्रिय झाली की, तिसर्‍या शतकात रोमन बादशहाने या प्रथेपासून पुरुषांना रोखण्यासाठी चक्क आदेशच काढला. मध्य युगानंतर पुरुष फक्त डाव्या कानातच कर्णभूषणे घालू लागले. पुढे पुरूष आणि स्त्रियांच्या केशरचनेत फरक झाले. केस लांब ठेवण्याची, तसेच कान केसांखाली झाकून घेण्याची पध्दत सुरू झाली. तेव्हा कर्णभूषणांची फॅशन मागे पडली, पण १५ व १६ व्या शतकात ती पुन्हा जोराने पुढे आली. 'स्त्रियांसाठीची कर्णभूषणे' तेव्हापासून फार लोकप्रिय झाली. पुरुषांच्या कर्णभूषणांची लोकप्रियता मात्र फारशी टिकली नाही. अर्थात, काही जाती-जमातींत मात्र पुरुष कानात घालतात. त्यात जिप्सी, खलाशी, तसेच इटली व स्पेनमधल्या काही गटांचा समावेश आहे. एके काळी कान टोचणे हे कानाच्या आरोग्यासाठी चांगले असते, असे डॉक्टर सांगत, पण आता कान टोचण्याचा तसा काही उपयोग असण्यावर डॉक्टरच विश्‍वास ठेवत नाहीत.