शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

नवे वर्ष, नवा संकल्प

नव्या वर्षात काय करायचं आपण ठरवलं आहे? वजन कमी करण्याची मोहीम की खर्च कमी करायचा निग्रह? नवीन वर्ष सुरू होताना हे अन् असे अनेक विचार डोक्यात रूंजी घालतात. दरवर्षी असे असंख्य विचार मनात येतात पण त्यातले प्रत्यक्षात किती उतरतात? 

योजनाबद्ध रितीने काम करायचे ठरवले आणि काही गोष्टींकडे लक्ष पुरवल्यास तुमचाही संकल्प सिद्धीस जाईल. स्वत:च्या सर्वांगीण उत्कर्षासाठी नवीन वर्षाचे आगमन ही चांगली संधी आहे. हा आशावादी काळ असल्याने नवीन वर्षांपासुनच नवे विचारही मनात रुजतात मग तो निश्चय सिगरेट सोडायचा असो किंवा व्यायाम करायचा, वजन कमी करायचा किंवा परिक्षेत चांगले मार्क मिळवण्याचा. पण योग्य विचारांना नियोजनांची साथ नसल्यास सगळे संकल्पाचे इमले कोसळायला वेल लागत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत संकल्पच करु नये हेच चांगले. 'मी हे करु शकतो' असा विश्वास ज्यांना वाटतो त्यांनी हे संकल्प सिद्धीसकसे न्यावे त्यासाठी हा लेखन प्रपंच.

संकल्प आधीच करा :-
नेहमी लोक वेळेवर संकल्प ठरवतात. पण हा विचार करत नाहीत की आपण हे कसे साध्य करू. त्यामुळे पहिल्यांदा तुमच्या चुकीच्या सवयी कोणत्या, त्या ओळखा. ज्या तुम्ही बदलू इच्छिता त्यापासून होणारे नुकसान, त्याचे फायदे, तोटे, दोन्ही बाजूंचा विचार करा. ठरवलेली गोष्ट कागदावर उतरवा. मनात दृढ निश्चय करून तुम्ही जे करू पाहता ते कसे करणार ते मनात ठरवा.

संकल्प एखादाच असावा :-
बरेच जण नववर्षाच्या तोंडवर खूप संकल्प करतात. उदा. सिगरेट सोडणे, वजन कमी करणे, अभ्यासात लक्ष घालणे, आई ‍वडिलांशी योग्य संवाद राखणे इत्यादी. एवढे सगळे संकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे एखादाच संकल्प पूर्ण सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करावा.

उद्दिष्ट स्पष्ट हवे:-
नेहमी फार मोठे टारगेट ठेवले जाते.उदा. मी परीक्षेत पहिला नंबर मिळवीन. त्यापेक्षा मी अभ्यास नियमित करून माझे मार्क वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करीन हा निश्चय जास्त योग्य आहे. असे केल्यामुळेच आपण आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो.

स्वत:ला वचन द्या :-
स्वत:च्या मनाशी जो निश्चय करतो तोच सफल होतो. ही गोष्ट जवळपास सगळ्या निर्णयांना लागू होते. दुसरे तुमचा आयडॉल बनू शकता. पण निर्णय पूर्ण करण्याचा पण तुम्हालाच पूर्ण करायचा आहे.

दुसर्‍यांची मदत घ्या :-
आपला निश्चय जगजाहीर करा. आपल्या कुटुंबात, मित्रांमध्ये या संकल्पाची माहिती द्या. काही लोक मी असा निर्णय घेतला होता हे नंतर सांगतात त्यापेक्षा आपला संकल्प आधीच जाहीर करा आणि आपल्या जवळच्यांना ते कशा प्रकारे मदत करू शकतात तेही सांगा.एका व्यक्तीने आठवड्यात तीन वेळा व्यायाम करण्याचा निश्चय केला व त्याने पत्नीला सांगितले की आठवड्याच्या ह्या तीन संध्याकाळी कोणताही कार्यक्रम ठरवू नकोस त्यामुळे त्याचे काम सोपे झाले व तो आपला निश्चय पूर्ण करू शकला. त्याचबरोबर इतरांना सांगितल्याने ते पूर्ण न केल्यास आपले हसे होईल या भावनेपोटीही संकल्पपूर्तीकडे लक्ष दिले जाते.

पर्याय निवडा :-
एक वाईट गोष्ट सोडण्याचा निश्चय पूर्ण करणे अवघड आहे. पण त्या तुलनेत चांगले काम करण्याचा निश्चय पाळणे सोपे आहे. त्यासाठी संकल्पांमध्येही ताळमेळ हवा. ते संकल्प जास्त यशस्वी होतात. संध्याकाळी ऑफीसहून लवकर घरी जाणे आणि गप्पा न मारता वाचलेला वेळ चांगल्या कामासाठी उपयोगात आणणे, असे संकल्प सिद्धीस जाऊ शकतात. पवनने आपले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला, तर दुसरा निर्णय रात्रीच्या जेवण्यापूर्वी काही न खाण्याचा घेतला. तो ऑफिसपासून घरी 2 किमी पायी जाऊ लागला. त्यामुळे त्याचा व्यायामही झाला व तो घरी अशा वेळेला पोहोचू लागला की जेवण्यापूर्वी काही खाण्यासाठी वेळच नाही.

जागरूक रहा :-
आपण रात्री उशिरा खाण्यावर बंधन घालू इच्छित असाल तर तो निश्चय कागदावर लिहून तो कागद फ्रिजवर चिकटावा. जर आपण एका आठवड्यात एक पुस्तक वाचण्याचा निश्चय केला असेल तर तो कागदावर लिहून काचेवर चिकटावा. जर वजन कमी करण्याचा पण केला असेल तर आपल्या डायनिंग टेबलाजवळ आपल्या आवडत्या अभिनेत्रीचा फोटो लावा त्यामुळे तो फोटोच तुमच्यावर अंकुश ठेवायचे काम करेल. या प्रकारे तुम्ही तुमच्या संकल्पाबद्दल जागरुक राहू शकता.

नकारात्मक निश्चय नको :-
जुने कर्ज फेडू शकत नसल्याने नवीन कपडे घेणार नाही हा निश्चय टिकणारच नाही. कारण जेव्हा तुम्हाला एखादा छान ड्रेस किंवा 25% डिस्काउंट असणारा कपडा दिसेल तेव्हा तो घेतलाच जाईल. त्यापेक्षा असे बजेट बनवा ज्यात कधी अशी खरेदीही करता येईल. नकारात्मक निश्चय टाळण्याकडेच कल वाढतो. त्यामुळे एकदम अवघड गोष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.

पळवाटा शोधू नका :-
तसा प्रत्येक दिवस नवाच असतो. 17 मार्चला तुमचा जेवण कमी करण्याचा संकल्प पाळला गेला नाही तर 18 मार्चपासून तो परत सुरू करा. वाटेतच सोडून देऊ नका. उद्यावर ढकलण्याचे कामही करू नका. वेळ हातात पकडता येत नाही. त्यामुळे नववर्षाचे आगमन नवीन संकल्पांसाठी चांगली संधी आहे. त्यामुळे कुणालाही नववर्षाच्या शुभेच्चा द्यायच्या असतील, तर आपल्य संकल्पाची माहितीही त्यांना द्या. आणि आता तो कसा पार पाडायचा तेही तुम्हाला माहीती झाले आहेच.

संकल्प आणि सिद्धी