शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

पाच ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व

WD
पृथ्वीबाहेरील अन्य ग्रहांवर जीवसृष्टी शोधणार्‍या शास्त्रज्ञांना हुरूप देणारी माहिती समोर आली आहे. नासाच्या शास्त्रज्ञांना पाच ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व सापडले आहे. ‘हबल’ टेलिस्कोपच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी या ग्रहांचे निरीक्षण केलं आहे.

‘डब्ल्यूएएसपी 17 बी’, ‘एचडी 209458 बी’, ‘डब्ल्यूएएसपी 12 बी’, ‘डब्ल्यूएएसपी 19 बी’ आणि ‘एक्सओ 1 बी’ अशी या ग्रहांना नावे देण्यात आली आहेत. या ग्रहांवरील पाण्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. यातील ‘डब्ल्यूएएसपी 17 बी’ या ग्रहाच्या वातावरणात पाण्याचे लक्षणीय प्रमाण असून, ‘एचडी 209458 बी’ या ग्रहावरून पाण्याचे अस्तित्वाचे सर्वात चांगले सिग्नल म‍िळत आहेत, अन्य ग्रहावरही पाण्याचे प्रमाण सातत्याने दिसत आले आहे, असे ‘नासा’च्या वतीने सांगण्यात आले आहे. याविषयी ‘नासा’च्या गॉडर्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे शास्त्रज्ञ एव्ही मँडेल म्हणाले, ‘अनेक ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व असण्याविषयी आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सूर्यमालेबाहेरील ग्रहांच्या वातावरणात किती प्रमाणात पाण्याचे अस्तित्व आहे?

तप्त आणि शीतग्रहांवरील पाण्याच्या अस्तित्वामध्ये किती फरक आहे, याचा अभ्यास करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. हे पाचही ग्रह प्रचंड मोठे असून ते त्यांच्या पितृतार्‍यापासून जवळच्याच अंतरावर आहेत. हे सर्व ग्रह तप्त आहेत. ‘हबल’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या निरीक्षणांमध्ये या ग्रहांवर पाण्याचे अस्तित्व वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येते. काही ठिकाणी पाणी विरळ असून, काही ठिकाणी ते अजिबात अस्तित्वात नाही. यामुळे या ग्रहांवर ढगाळ वातावरण असण्याचे संकेत मिळतात, असेही यामध्ये म्हटले आहे.