प्रकाशोत्सव दीपावली
- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले
दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आहे. धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. 'सुईला छेदल्यास तिच्यातून उंट निघतो. परंतु, धनवंताला स्वर्ग मिळत नाही. या ख्रिश्चन धर्मातील म्हणीला भारतीय सहमत नाहीत. त्यांच्या दृष्टीकोनातुन श्रीमंत लोकच देवाचे लाडके असतात.
लक्ष्मी चंचल नाही तर मनुष्याची वृत्ती चंचल आहे. पैसा या शक्तीच्या आधारे मनुष्य देव किंवा राक्षस बनू शकतो. लक्ष्मी केवळ उपभोगाचे साधन आहे असे मानणार्या मनुष्याचे लवकरच अध:पतन होते. परंतु, तिची पूजा करून तिला परमेश्वरी प्रसाद मानणारा मनुष्य स्वत: पवित्र आणि सृष्टीलाही पवित्र बनवितो. वाममार्गाने वापरलेल्या लक्ष्मीची अलक्ष्मी होते. स्वार्थ आणि परमार्थासाठी वापरलेल्या लक्ष्मीला वित्त आणि धनलक्ष्मी असे म्हणतात. देवकार्यासाठी वापरलेली लक्ष्मी महालक्ष्मी असते. महालक्ष्मी हत्तीवर बसून सजून येते. हत्ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारपणे लक्ष्मीचा वापर करणार्यांजवळ पिढ्यान-पिढ्या ती राहते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रघुवंश होय. ती एक महान शक्ती असल्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या हातात राहिली पाहिजे. कारण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो. नरकचतुर्थी: नरकचतुर्थीला महाकालीची पूजा केली जाते. स्वत:च्या स्वार्थासाठी शक्ती खर्च करणारा दुर्योधन, दुसर्याच्या चरणी शक्ती ठेवणारा कर्ण आणि देवकार्यात शक्तीचे हवन करणारा अर्जुन या महाभारतातील तीन पात्रांना महर्षी व्यासांनी उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडले आहे. नरकचतुर्थीला कालचतुर्थी असेही म्हणतात. त्यामागे अशी कथा आहे की, नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचाराचे थैमान मांडले होते. त्याच्या अत्याचारापासून स्त्रियांचीदेखील सुटका झाली नव्हती. त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचा विचार केला. श्रीकृ्ष्णाच्या मदतीने सत्यभामेने नरकासूराचा वध करून स्त्रियांचा उद्धार केला. अमावस्येच्या त्या रात्री सर्व लोकांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता. दिवाळी:दिवाळी म्हणजे वैश्यांच्या (व्यापाऱ्यांच्या) हिशोब-वही पूजेचा दिवस! संपूर्ण वर्षाचे लेखा परिक्षण करण्याचा दिवस होय. या दिवशी मनुष्यानेही त्याच्या जीवनाचा लेखा-जोखा तयार केला पाहिजे. राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.बलिप्रतिपदा (पाडवा):नवीन वर्षाला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्थेला उध्वस्त करणार्या बळीचा विष्णूने पराभव केला होता. म्हणून त्याच्या स्मरणार्थ बलिप्रतिपदा साजरी केली जाते. बळी दानशूर राजा होता. या दिवशी त्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कांता आणि कनकेच्या (लक्ष्मी) मोहात आंधळा झालेला मनुष्य राक्षस बनू शकतो. म्हणून भगवान विष्णूने बळीचा पराभव करून कनक आणि कांतेकडे एका विशिष्ट नजरेने बघणार्यांना तीन दिवस उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीकडे पूज्य दृष्टीने पहावे. भाऊबीजेच्या दिवशी समस्त स्त्रियांकडे आई किंवा बहिणीच्या नजरेने पाहिले पाहिजे. स्त्री ही आदरणीय आहे. मोह म्हणजे अंधकार! दीपोत्सव म्हणजे अज्ञान आणि मोहाच्या खोल अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे प्रयाण करणे होय. दिवाळीला दिवे बाहेर जळतात. परंतु आपल्या मनात योग्य दीप प्रकट झाला पाहिजे. मनात अंधकार असल्यास बाहेर जळणारे दिवे निरर्थक ठरू शकतात. दीपक ज्ञानाचा प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी जीवन सार्थकी लावण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. नरकचतुर्थीला जीवनात नरक निर्माण करणार्या नरकासूरांचा नाश केला पाहिजे. दिवाळीच्या दिवशी 'तमसो मां ज्योतिर्गमय' या मंत्राची साधना करून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षाच्या दिवशी जुने भांडण विसरून शत्रूला जवळ केले पाहिजे. नवीन वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस! अशा प्रकारे समजूतदार ज्ञानाचे दिवे आपल्या मनात लावले तर आपले जीवन सदैव दीपोत्सवासारखे उजळेल.