testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

शिवसेना, मुंबई आणि मराठी माणूस

- अभिनय कुलकर्णी

वेबदुनिया|

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली तरी मुंबईतून महाराष्ट्र हळू हळू वजा होऊ लागला होता. कारण मुंबईत मराठी लोकांच्या बरोबरीने गुजराती व इतर भाषिक लोकही मोठ्या संख्यने वाढत होते. त्याचबरोबर मुंबईच्या सर्व आर्थिक नाड्या अमराठी उद्योजकांच्या हातात होत्या. त्यामुळे राज्य स्थापन झाले तरी असूनी खास मालक घरचा कष्ट मात्र त्याला अशीच मराठी माणसाची अवस्था होती. नोकरीतही त्याला दुय्यम स्थान मिळू लागले होते. व्यापारात गुजराती, मारवाडी आणि नोकरीत दाक्षिणात्यांना प्राधान्य दिले जाऊ लागले होते. हे सहन होत नसल्याच्या असंतोषानेच शिवसेनेला जन्म दिला.

त्यावेळी व्यंगचित्रकार म्हणून काम करत असलेल्या बाळासाहेबांनी फ्री प्रेस व्यवस्थापनाशी झालेल्या मतभेदातून नोकरीचा राजीनामा दिला. मग त्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले. त्यांनी मग मार्मिक नावाचे व्यंगचित्र नियतकालिक काढून हा प्रश्न मांडायला सुरवात केली. सुरवातीला ते मुंबईतील टेलिफोन डिरेक्टरी छापायाचे व त्याला शीर्षक द्यायचे वाचा आणि थंड बसा. एवढ्या एका वाक्याचा जोरदार परिणाम व्हायचा. कारण या डिरेक्टरीत मराठी माणसाचे नावच नसायचे.
यानंतर मग मराठी माणसाच्या एकजुटीला संस्थात्मक पातळीवर आणण्यासाठी १ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या स्थापनेला कॉंग्रेसचाही अंतर्गत पाठींबा होता, असे बोलले जाते. सुरवातीला मग शिवसेनेने दाक्षिणात्यांविरोधात आंदोलनाचा धडाका उडवून दिला. उडपी रेस्टॉरंट्वर हल्ले कर. दाक्षिणात्यांना सताव असे उद्योग सुरू केले. लुंगी हटाव, पुंगी बजाव ही गाजलेली घोषणा याच काळातली. एकीकडे शिवसेना हे करत असताना समाजकारणाकडेही लक्ष देत होती. मुळात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे शिवसेनेचे समीकरण होते. अर्थात आता ते उलटे झाले असले, तरी तेव्हाची शिवसेना सामान्य मराठी माणसाला तिच्या मराठी बाण्यामुळे आपलीशी वाटली. म्हणूनच मुंबईत तिचा वेगाने विस्तारही झाला.
मुंबई महाराष्ट्रात आल्यानंतरही काही अमराठी लोक मुंबई तुमची भांडी घासा आमची असे म्हणत त्यांना मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची असे ठणकावून सांगण्याची ताकद सामान्य मराठी माणसाला शिवसेनेने दिली. पुढे शिवसेनेनेही समाजकारणाबरोबर राजकारणातही भाग घेतला. राजकारणात शिरल्यानंतर शिवसेनेने मुंबई महापालिकेची सत्ताही मिळवली. मराठी माणसांना नोकऱ्यांत प्राधान्य मिळावे यासाठी लोकाधिकार समितीची स्थापना करून मराठी भाषकांना नोकऱ्याही मिळवून दिल्या.
पण पुढे सत्ताकारणात शिवसेनेने हिंदूत्वाची कास धरली आणि मराठी माणसाला सोडून दिले. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला मोठा जनाधार मिळाला, तरी मराठी माणूस मात्र काठावरच राहिला. शिवसेनेची पुढे राज्यात सत्ता स्थापन झाली तरी मराठी माणसाला फारसे काही मिळाले नाही. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेने मुंबईत साठ उड्डाणपूल बांधले, मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. पण परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत. उलट झोपडपट्टीवासीयांना चाळीस लाख घरे देण्यामुळे परप्रांतीय मात्र मोठ्या प्रमाणात मुंबईकडे आले.
पुढे पुढे तर राज्यात सत्तेवर यायचे असेल तर परप्रांतीयांना चुचकारण्याशिवाय गत्यंतर नाही, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने उत्तर भारतीयांचे मेळावेही घ्यायला सुरवात केली. उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीत यांनी उत्तर भारतीयांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. त्यांनी मी मुंबईकर या नावाची योजना याचसाठी सुरू केली होती. पुढे राज शिवसेनेत असताना त्यांनी या योजनेलाच मराठीपणाची जोड देऊन उद्धव यांना शह देण्याचा प्रयत्न केला.
मराठी माणसासाठी शिवसेनेत असताना राज ठाकरे यांनी शिवउद्योग सेना स्थापन केली. त्यासाठी मायकल जॅक्सनला आणून नाचवले. पण मराठी माणसाला जॅक्सनचा काहीही फायदा झाला नाही आणि मराठी माणूसही उद्योग करण्याचे काही शिकला नाही. याशिवाय मराठी माणसातील उद्योजकतेला, त्याच्या हितसंबंधांचे रक्षण करायला शिवसेना फारशी पुढे धावली नाही. पुढे मराठी माणसापेक्षा सत्तेचे गणित महत्त्वाचे ठरले. सहाजिकच त्याच्यासाठी तडजोडीही कराव्या लागल्या.
एवढी वर्षे मुंबईत शिवसेना सत्तेवर असूनही परप्रांतीयांचा प्रश्न शिवसेना हाताळू शकली नाही. आता राज यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतल्यानंतरही शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी शिवसेनेने मराठी माणूस व हिंदूत्व हे दोन्ही मुद्दे हाती घेतले आहेत, असे सांगितले. म्हणजे मुंबई महापालिकेत सत्ता आणण्यासाठी शेवटच्या क्षणी मराठी माणसाला साद घालायची आणि उत्तर भारतीयांना चुचकारण्यासाठी उत्तर भारतीय दिवस साजरा करायलाही जायचे.
शिवसेनेने आता आपल्या भूमिकेचीच पुन्हा एकदा तपासणी करण्याची गरज आहे.

संबंधित माहिती


यावर अधिक वाचा :