सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

गरम कपड्यांची काळजी

थंडीत आपण वेगवेगळ्या प्रकारचे गरम कपडे वापरतो. एकदा विकत घेतलेले हे कपडे पुष्कळ वर्षे आपण वापरू शकतो. आपण जर ते योग्य प्रकारे ठेवले (वापरले) तर खुप वर्षांपर्यंत ते नव्यासारखे राहू शकतात. तर पहा आपण त्यांची अशी काळजी घेऊ....

WDWD
* जॅकेट:
हल्ली बरेच जण लेदरचे जॅकेट वापरतात. हे जॅकेट धुवावे लागत नाही. मऊ ब्रशने घासल्यास ते साफ होते. चांगल्या कंपनीचे जॅकेट घरी न धुता ड्रायक्लिन करून घ्यावे. घरीच साफ करण्याची गरज पडल्यास पेट्रोलमध्ये भिजविलेला ब्रश खालून वर जोर देऊन फिरवावा. जॅकेट साफ होईल. बाहेरून आल्यावर जॅकेट उतरवून तसेच टाकू नये. काही वेळ उन्हात टांगून ठेवावा. त्यामुळे त्यावरील घाम वगरे वाळून जाईल. त्यानंतर ते हँगरला अडकवून ठेवा.

NDND
* इनर:
थंडीपासून बचाव करण्यासाठी हल्ली थर्मल वेअर किंवा इनरही (आत घालायचे गरम कपडे) वापरले जातात. इनरमुळे थंडीपासून पुर्ण बचाव होतो. चांगल्या कंपनीचे इनर दोनतीन वर्षे वापरता येऊ शकतात. पण यांच्या धुण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. इतर कधीही जोरजोरात घसडे मारून घासून धुवू नये. शक्यतो मशीनमध्येही धुवू नये. मशीनमध्ये धुवायचेच झाल्यास एकदम स्लो मशीनमध्ये धुवावेत. कारण जोरजोरात घासल्याने त्यांचे धागे विरळ होतात. व त्यांचा गरमपणा कमी होतो. कपडे ओघळतात. हलक्या हाताने साबण लावून त्याला हलकेच पिळून काढावेत.

* मोजे व हातमोजे:
थंडीपासून बचावासाठी सूती मोजे वापरावेत. यांना धुण्यापुर्वी तोंडाजवळ धाग्याने बांधावे व वाळल्यावर गाठ सोडावी. त्यामुळे ते मोठे होत नाहीत (ओघळत नाहीत) व घातल्यावर फीट बसतात. दुजाकी चालवण्यासाठी जीन्सचे हातमोजे वापरावेत. घरी आल्यावर त्यांना ऊन, हवा दाखवून योग्य जागेवर ठेवावेत. म्हणजे योग्यवेळी ते सापडतील.

* रजई:
साधारण घरात व्हेलवेट, कॉटन, रेशमी किंवा कोसा रजई असते. या वापरण्यापूर्वी उन्हात ठेवाव्यात. त्यामुळे त्यावरची जमलेली धुळ नाहीशी होते. यांना दहा पंधरा दिवसांनी कपड्याच्या ब्रशने साफ करावे. म्हणजे त्यांची चमक बराच काळ टिकते. रजई धुता येत नाही त्यामुळे मळल्यावर त्यांना ड्रायक्लीन करावे. रजई घाण होऊ नये म्हणून त्यावर चांगले कव्हर (खोळ) घालावी. रजया ठेवून देण्यापूर्वी ड्रायक्लीन करून त्यात डांबरगोळ्या घालून ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवा की रेशमी रजयांवर जास्त दाब देऊन किंवा घडी करून ठेवू नये.

* कांबळे:
घरी धुवू शकतो पण त्याला ब्रश लावू नये. शक्यतो ड्रायक्लीनच करावे. त्यामुळे ते जास्त दिवस टिकतात. वापरण्यापूर्वी मोकळ्या हवेत उन्हात टाकावेत. त्यामुळे त्यातला दमटपणा कमी होतो. व जंतूंचा प्रादुर्भावही कमी होतो. त्यांनाही दाबून ठेवू नये व त्यांच्यावर जास्त वजनही ठेवू नये. थंडीनंतर यांना ड्रायक्लीन करून ठेवावे.

NDND
* शाल:
शाल थंडीपासून बचावाबरोबरच स्टाईलीश लूकही देतात. काश्मीरी किंवा पश्मिना लोकरी सारख्या शाली नेहमी ड्रायक्लिनच कराव्यात. इतर साध्या शालींना धुवायचे असल्यास रिठ्याच्या पाण्याच्या फेसात धुवावे. चांगल्या प्रकारे खळखळून नंतर पाण्यात लिंबाचा रस व थोडेसे ग्लिसरीन मिसळलेल्या पाण्यातून काढल्यास त्यांची चमक व नवेपणा कायम राहतो.

NDND
* कोट व जर्कीन:
एकदा घेतलेला कोट व जर्कीन खूप वर्षांपर्यंत चालतो. म्हणून या ठेवणीतल्या कपड्यांकडे जास्त लक्ष द्यायला हवे. बाहेरून आल्यावर थोडा वेळ त्याला बाहेर काढून ठेवावे. त्यांना पातळ हँगरवर अडकवू नये. कारण त्यामुळे त्याचा आकार बिघडतो. म्हणूनच अशा कपड्यांना अडकविण्यासाठी जाड व मोठे हँगर वापरावेत.

* पुल-ओव्हर, कार्डीगन यासारखे गरम कपडे:
यांनाही गरम पाण्यात किंवा मशीनमध्ये धुवू नये. हलक्या हाताने उलटून धुवावे. नेहमी मऊसर साबण (चांगला शाम्पूही चालेल) वापरावा. पाण्याच्या धारेच्या खाली धरू नये. खूप वेळ पाण्यातही बुडवून ठेवू नये. या कपड्यांना कडक उन्हात व खूप घट्ट पिळूनही वाळत घालू नये.

* मफलर, स्कार्फ, टोपी:
यांना वरचेवर धुवू नये. बाहेरून आल्यावर ऊन दाखवावे. यांना मऊसर साबण्याच्या पाण्याने धुता येते. यांनाही ब्रश लावू नये किंवा फार घसडे मारू नयेत.
* सुचना: गरम किंवा लोकरीच्या कपड्यांना इस्त्री करावी.