जॅकेटचे ट्रेंडी आणि हटके पर्याय!
थंडीच्या दिवसांतला सगळ्यात आवडता ट्रेंड म्हणजे जॅकेट. सध्या असलेलं मस्त थंड वातावरण पाहता हा
ट्रेंड फॅशनबरोबरच तुमची, तुमच्या त्वचेची काळजी घेतं. तुम्ही जे जॅकेट घालता, ते तुचच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते.
पफर - या थंडीतले हे सर्वात ट्रेंडी असे जॅकेट खूप आरामदायक आणि उबदार आहे. पूर्वी स्कीइंगसाठी वापरले जाणारे हे जॅकेट आता जिथे खूप कडाकची थंडी असते अशा ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरते आहे. या मोसमात तुमचे नेहमीचे काळे जॅकेट आणि लोकप्रिय होत चाललेली रंगीत जॅकेट आलटून पालटून घालत राहा. काळी जॅकेट ही केव्हाही उत्तमच असतात व ती सुसंस्कृत आणि औपचारिक लूक देतात तर इतर सर्व ठिकाणी रंगीत जॅकेट घालता येतात.
बोल्ड चेक्स- चौकटीची जॅकेट अनेकांच्या हिवाळी वॉर्डरॉबमध्ये हमखास दिसतात. यंदाच्या मोसमात ही चौकडी अधिक ठळक आणि उठावदार झाली आहे. क्लासी आणि अत्याधुनिक दिसण्यासाठी टर्टल नेक सोबत हे जॅकेट घाला. जर तुम्हाला ही चौकडी खूप पुरुषी वाटत असेल तर फुलाफुलांच किंवा नाजूक ब्लाऊजवर आणि नाजुकशा कानातलंसोबत घाला.
फ्लीस- सध्या थंडी असल्यामुळे तुम्हाला फ्लीस जॅकेट सगळीकडे दिसत असेल पण यंदाच्या मोसमात त्याचा अधिकृत ट्रेंड आहे, विशेषतः प्रिंटेड फ्लीस किंवा सुशोभित व कलाकुसर केलेल्या फ्लीसचे चलन आहे. लोकर किंवा शर्लिंगच्या विपरीत फ्लीस हे पूर्णपणे कृत्रिम असते, त्यामुळे ते ऊब धरून ठेवते.
इंडियन फॅब्रीक- जर तुम्ही अशा भागात राहात असाल, जेथे खूप जास्त थंडी नसेल, तर इकत आणि बाटिक सारख्या कापडातील आधुनिक भारतीय फॅशनची जॅकेट तुम्ही वापरू शकता. ही जॅकेट सुती असली तरी, त्यात गुरफटून बसले की, छान ऊब मिळते. ही जॅकेट तुम्हाला कलात्मक आणि फॅशनेबल लुक देतात. कामावर जाताना ट्राउझर, पेन्सिल स्कर्ट किंवा डार्क डेनिसोबत ही जॅकेट घाला.
बेल्टेड- जेव्हा ट्रेंड कोटचा विचार केला जातो तेव्हा बेल्टेड कोट डोक्यात येतोच. जॅकेट कमरेशी बांधून मग थोडे सैल ठेवण्याची त्यात कल्पना असते. घट्ट जीन्स किंवा चांगल्या फिटिंगच्या पँटसोबत ही जॅकेट शोभून दिसतात व तुम्ही त्यात जाड दिसत नाही.