शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. सण
Written By वेबदुनिया|

लोक कथा : ओणम

WD
महाबली राजाच्या दरबारात आलेला वामन
महाबली हा दैत्यांचा बलाढ्य राजा होता. त्याच्या पराक्रमामुळे स्वर्गातील देवांनाही परगंदा व्हावे लागले. तो दैत्य असूनही विष्णुचा भक्त होता. स्वर्गातून हद्दपार झालेल्या देवांनी कश्यप ऋषींची पत्नी अदितीकडे महाबलीची तक्रार केली. मग अदितीने विष्णुला त्यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले, विष्णुने ते मान्य केले. याच सुमारास महाबलीने एका मोठ्या मेजवानीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी येणाऱ्या प्रत्येक अतिथीची मनोकामना पूर्ण केली जाईल असे त्याने जाहीर केले होते. या मेजवानीला विष्णुने ब्राह्मण बटूच्या वामनाच्या रूपात तेथे हजेरी लावली आणि महाबलीकडे तीन पावले जमिनीची मागणी केली. वामनाची विनंती मान्य झाली. त्यानुसार वामनाने आपल्या दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग पादाक्रांत केला. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी वामनाने महाबलीकडे जागा मागितली. त्यावर महाबलीने तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवण्यास वामनाला सांगितले. वामनाने लगेच तिसरे पाऊल महाबलीच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात ढकलले.

वामनाचे त्रिविक्रम रुप
महाबलीची वचननिष्ठा पाहून वामनाने त्यास वर मागण्यास सांगितले. त्यानुसार महाबलीने वर्षातून एकदा आपल्या राज्यात येऊन प्रजेला भेटण्याचा वर वामनाला मागितला. तेव्हापासून महाबली राजा आपल्या प्रजेला भेटण्यास दरवर्षी येतो असे मानले जाते.

महाबली राजाने आपल्या वचनासाठी आपले राज्यच काय पण आपले प्राणही वामनाला देण्यास मागेपुढे पाहिले नाही. त्याच्या अशा गुणांमुळेच तो लोकप्रिय राजा ठरला, घरोघरी त्याची पुजा होऊ लागली, त्याला देवत्व प्राप्त झाले. ओणमच्या दिवसात वामनाच्या मुर्तीचीसह महाबलीच्या मुर्तीचीही स्थापना घरोघरी केली जाते.