शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By वेबदुनिया|

शेतकऱ्याच्या स्थितीवरील निरागस रूपक - टिंग्या

PRPR
निर्माता : स्माल टाऊन बॉय प्रॉडक्शन
दिग्दर्शक : मंगेश हाडवळे
गीत : प्रकाश होळकर
संगीत : रोहित नागभिडे
कलाकार : शरद गोयेकर, तरन्नुम पठाण, अजित गावंडे, इनेश चौहान, सुनील देव, माधवी जुवेकर, चित्रा नवाथे, विठ्ठल उमप.

दुष्काळ, कर्जबाजारीपणा व अठरा विश्व दारिद्र्याच्या चक्रात अडकलेल्या शेतकर्‍यांच्या दयनीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टिंग्या या चित्रपटाचे कथानक उभे राहते. सात वर्षाचा टिंग्या व त्याचा प्राणप्रिय चितंग्या नावाचा बैल यांच्यातील मैत्रीच्या नात्यातून दिग्दर्शकाने शेतकऱ्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे.

सुगीचा हंगाम आल्याने कारभारी नावाचा शेतकरी बटाट्याच्या काढणीची तयारी करत असतो. आलेल्या पिकातून त्यास गावातील सावकाराचे देणे फेडायचे असते. एके दिवशी सायंकाळी शेतातून येत असताना मागे लागलेल्या बिबट्यापासून सुटका करण्याच्या नादात चितंग्याचा (बैल) पाय मोडतो. चितंग्या पायावर उभा राहू शकत नसल्याने शेताची नांगरणी खोळंबते.
PRPR
.

कारभारी व त्याची पत्नी अंजना त्याचे औषधपाणी करते. पण चितंग्याचा पाय काही बरा होत नाही. नांगरणी लांबल्यास पीक वाया जाण्याची भीती असते. सावकाराचे कर्ज डोक्यावर असलेला कारभारी अस्वस्थ होतो. चितंग्याला कसायाकडे विकून आणि त्यात काही पैसे घालून नवीन बैल आणण्याचा पर्यायच कारभारीसमोर शिल्लक राहतो. कारभारीचा मुलगा टिंग्या मात्र या निर्णयाने अस्वस्थ होतो. त्याच्या बालसुलभ व संवेदनशील मनाला काम करू शकत नाही म्हणून बैलाला कसायाला विकण्याचा विचार मानवत नाही.

त्याच्यालेखी चितंग्या फक्त बैल नसून लहान भावासारखा आहे. त्यांनी अनेक क्षण एकत्र घालवले असतात. सोबतच लहानाचे मोठे झालेले असतात. त्यामुळे त्याला विकण्याची कल्पनाही तो करू शकत नाही. त्यामुळेच रशिदाची आजी म्हातारी झाली म्हणून काम करू शकत नाही, मग तिला का नाही विकत कसायाला? ते सर्वजण तिची काळजी घेतायेत. मग माझ्या चितंग्याशी दुजाभाव का? असे प्रश्न विचारतो.

त्याच्या निरागस व बालसुलभ प्रश्नांचे उत्तर कुणाकडेही नसते. सावकाराच्या कर्जाची परतफेड करू न शकलेल्या पांडूने दोन दिवस अगोदरच आत्महत्या केलेली आहे. शेजारच्या आजीचा मृत्यू व बैलाची कत्तलखान्यास विक्रीचा प्रसंग एकाचवेळी समोरासमोर येतात. टिंग्याच्या निरागसतेतून अस्तित्वाच्या शाश्वतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. भारतीय शेतकर्‍यांच्या जीवनातील दयनीय, परीक्षा घेणार्‍या व काळ्याकुट्ट भवितव्याबाबत टिंग्या अप्रत्यक्षपणे भाष्य करतो.

PRPR
दिग्दर्शक मंगेश हाडवळे चाकोरीबाह्य व आव्हानात्मक चित्रपटामधून दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत. या कथानकाची प्रेरणा सामाजिक परिस्थितीतूनच मिळाल्याचे ते सांगतात. ते म्हणतात, विकासाचे फळ मोजावे लागते. संख्येत आपण विकासाची आकडेवारी सांगू शकत असलो तरी त्यासाठी काय काय गमावले ते सांगू शकत नाही. विकासाच्या नावावर आपण माणसा माणसांतील संवाद गमावला. विकासाची दुसरी बाजू विषमता असते. मात्र, ते मानायला आपण तयार नाही. हे कथानक फक्त महाराष्टा्चेच नाही. आसाम, बंगाल, मध्यप्रदेश कोठेही जा परिस्थिती सारखीच. राज्य बदलतात, संदर्भ बदलतात मात्र सगळीकडे परिस्थिती सारखीच असते.

द स्मॉल टाऊन बॉय प्रॉडक्शनतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सहाय्यक दिग्दर्शक ते दिग्दर्शक आणि आता निर्माते असा प्रवास केलेले रवी राय या संस्थेचे प्रमुख आहेत. वृत्तपत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्यांनी वाचून अस्वस्थ व्हायचो. योगायोगाने मंगेश माझ्याकडे याच संदर्भातील कथा घेऊन आला आणि मी त्यावर चित्रपट तयार करण्याचे ठरविले असे श्री. राय यांनी सांगितले. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या संस्थेतर्फे आता इंडिया काम्युफ्लेज्ड नावाच्या चित्रपटावर काम करण्यास सुरवात केली जाणार आहे. राजस्थानातील एका खेडेगावातील मुलगा त्याच्या आईसोबत पाणी आणण्यासाठी अठरा किलोमीटर चालत जातो. त्याच्या या प्रवासाची कहाणी यात असेल.