हत्तीची स्मरणशक्ती
वर्षानुवर्षे विविध प्राण्यांच्या बाबतीत विविध प्रकारच्या समजुती चालत आल्या आहेत आणि हळूहळू त्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. अशीच एक समजूत म्हणजे हत्तींची स्मरणशक्ती.
हत्तीला एकदा पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीचे विस्मरणच होत नाही अशी लोकांची समजूत होती, पण खरं तर असे आहे की, हत्तींची स्मरणशक्ती चांगली असते. किंबहुना इतर अनेक प्राण्यांपेक्षा ती चांगली, हेही खरे! एवढेच नव्हे तर एखाद्या माणसाने हत्तीला काही दुखापत केली असेल व त्यानंतर अनेक वर्षांनी त्या हत्तीला तो माणूस दिसला तरी हत्तीने त्याच्यावर हल्ला केल्याची उदाहरणेही बरीच आहेत. तरीही हत्तीला एकदा पाहिलेल्या गोष्टीचे कधीच विस्मरण होत नाही अशी काही परिस्थिती नाही. हत्तीलासुध्दा विस्मरण होते, तोसुध्दा अनेक गोष्टी विसरतोच!
याचा एक पुरावाही पुरेसा आहे. तो म्हणजे सर्कशीतल्या हत्तींना विविध कसरती शिकवणारा शिक्षक हत्तींना वेळोवेळी मारत असतो आणि सक्तीने त्यांच्याकडून कसरती करून घेत असतो. शिक्षकाचे हे मारणे जर हत्ती विसरत नसता, तर त्याने त्या माणसावर सदैव हल्लेच केले असते!