बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (22:38 IST)

अवकाळी पाऊस म्हणजे काय? गारपिटीमागे असतात 'ही' कारणं

nashik rain
जान्हवी मुळे
अवकाळी पाऊस, गारपीट, वीजा, सोसाट्याचा वारा, शेतीचं नुकसान...गेले काही दिवस बातम्यांमध्ये हे आणि असे शब्द तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकले असतील.
 
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना दरवर्षी अवेळी पावसाचा फटका बसतो, जनजीवन विस्कळीत होतं आणि त्यामुळे हजारो एकर शेतीचं नुकसान होतं.
 
पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे पडतो? अवकाळी पावसाचं प्रमाण वाढतंय का आणि त्यानं होणारं नुकसान टाळण्यासाठी काय करायला हवं, जाणून घेऊयात.
 
अवकाळी पाऊस म्हणजे काय?
अवकाळी पाऊस म्हणजे पावसाळ्याचा काळ सोडून पडणारा पाऊस.
 
भारतात 1 जून ते 30 सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा काळ मानला जातो. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मान्सूनमुळे पाऊस पडतो.
 
पण पाऊस काही माणसासारखं असं ठराविक वेळापत्रक पाळत नाही. त्यामुळे या तारखा थोड्या पुढे मागे सरकू शकतात.
 
पण साधारणपणे आपल्या सोईसाठी मान्सूनपूर्व आणि नैऋत्य मान्सूनचा काळ हा महाराष्ट्रात पावसाळ्याचा ऋतू म्हणून ओळखला जातो आणि त्यापलीकडे पडणाऱ्या पावसाला अवकाळी पाऊस म्हणतात.
 
इथे एक लक्षात घ्यायला हवं, की अवकाळी असा शब्दप्रयोग रूढ झाला असला, तरी ही काही कुठली वैज्ञानिक संज्ञा नाही आणि पावसाळा सोडून इतर महिन्यांत म्हणजे हिवाळा किंवा उन्हाळ्यात कधीतरी पाऊस पडणंही नवं नाही.
 
पण नेमका किती पाऊस या बाकीच्या महिन्यांमध्ये पडतो?
 
अवकाळी पावसाचं प्रमाण काय आहे?
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात साधारण 80 ते 85 टक्के पाऊस हा मान्सूनमुळे पडतो. म्हणजे उरलेला 15 ते 20 टक्के पाऊस हा साधारण नोव्हेंबर ते एप्रिल या काळात पडतो.
 
अवकाळी पाऊस कशामुळे पडतो? याची वेगवेगळी कारणं असू शकतात. कधी एखाद्या मोठ्या वातवारणीय घडामोडीमुळे तर कधी स्थानिक पातळीवरील हवामानाच्या स्थितीमुळे पाऊस पडू शकतो.
 
भारतीय द्वीपकल्पाच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसरीकडे बंगालचा उपसागर आहे.
 
मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतरचा काळ हा दोन्ही समुद्रांमधला सायक्लोन सीझन आहे, म्हणजे या काळात इथे कमी दाबाचे पट्टे, वादळं, चक्रीवादळं तयार होतात आणि त्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही वादळी पाऊस पडू शकतो.
 
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडू शकतो. वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजे उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळं किंवा झंझावात. हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या वादळांमुळे काश्मिर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव होतो तर उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो.
 
समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा एकमेकांनी भिडल्यानं फेब्रुवारी मार्चमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो.
 
उष्ण वारे आणि थंड वारे एकमेकांना भिडल्यानं हवा वर जाते आणि उंच ढग निर्माण होता. अशा क्युमुलोनिंबस नावाच्या ढगांमुळे पाऊस पडतो. अशा ढगांची उंची खूप जास्त असेल, तर त्यातून गारांची निर्मिती होते आणि त्या खाली कोसळल्यावर गारपीट होते.
 
काही हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनो आणि ला निना अशा हवामानाच्या स्थितींमुळेही हिवाळ्यात पडणाऱ्या पावसावर परिणाम होऊ शकतो.
 
कारणं वेगवेगळी असली, तरी एक गोष्ट समान आहे. अशा पावसामुळे अनेकदा शेतीला फटका बसतो. विशेषतः फळबागा, ऊस, कांदा आणि रबी पिकांचं नुकसान होतं. गावा-शहरातलं जनजीवन आणि उद्योगांवरही परिणाम होतो आणि कधी कधी मोठी आपत्तीही ओढवू शकते.
 
अवकाळी पावसामुळे नुकसान टाळता येईल का?
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलामुळे अवकाळी पावसानं होणारं नुकसान वाढू शकतं असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करतायत.
 
अशा पावसाचं आणि गारपिटीचं पूर्वानुमान लावणं पूर्वी शक्य नसायचं. पण आता तंत्रज्ञान प्रगत झालं आहे. भारतीय हवामान विभाग त्याविषयी वेळोवेळी माहिती, अंदाज आणि इशारा जारी करत असतो. IMD च्या अधिकृत वेबसाईटवरही त्याची माहिती दिली जाते.
 
पण गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाचे आकडे पाहिले, तर स्थानिक पातळीवर अधिक अचूक आणि वेळेत ही माहिती देणारी यंत्रणा उभारणं जास्त फायद्याचं ठरू शकतं.
 
अवकाळी पावसामुळे शेतीतलं नुकसान टाळायची, तर तज्ज्ञांच्या मते पिकांमध्ये विविधता आणणं, शेतीचा विमा, नुकसान झाल्यावर लवकरात लवकर पंचनामे करून मदत पुरवण्याची व्यवस्था अशा गोष्टींची गरज आहे.