शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जून 2023 (10:04 IST)

डायबिटीसवर आलेला हा नवा रिपोर्ट भारतासाठी धोक्याची घंटा आहे का?

diabetes
लॅन्सेटच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अभ्यासानुसार, भारतातील 10.1 कोटी लोक मधुमेहग्रस्त आहेत.
 
तर दुसऱ्या बाजूला भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील 13.6 कोटी लोक मधुमेहपूर्व अवस्थेत जगत आहेत.
 
टाइप-2 मधुमेह हा या आजाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे.
 
मधुमेहग्रस्त लोकांच्या शरीरात पुरेशा प्रमाणात इन्सुलिन संप्रेरक तयार होत नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. हे संप्रेरक योग्य प्रकारे कार्य करत नसल्यास मधुमेहास आमंत्रण मिळतं.
 
द लॅन्सेट डायबिटीस अँड एंडोक्राइनोलॉजी संशोधन अहवालात भारतातील प्रत्येक राज्याचा व्यापकपणे आढावा घेण्यात आला आहे. यात देशावर असलेल्या असंसर्गजन्य रोगांच्या भाराचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
 
संशोधकांचं असं म्हणणं आहे की, भारतात मधुमेहाचा प्रसार पूर्वीपेक्षा वाढला आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, भारतात 7.7 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त असतील तर सुमारे 2.5 कोटी लोक मधुमेहपूर्व अवस्थेत आहेत. भविष्यात मधुमेह होण्याच्या जोखमीला प्री-डायबेटिस म्हटलं जातं.
 
या संशोधनाच्या प्रमुख लेखिका आणि डॉ. मोहन डायबिटीस स्पेशॅलिटी सेंटरच्या संचालक डॉ. आर.एम. अंजना यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला सांगितलं की, "ही परिस्थिती टाइम बॉम्बसारखी आहे."
 
त्या सांगतात, "जर व्यक्ती मधुमेहपूर्व स्थितीत असेल तर आपल्या लोकसंख्येमध्ये मधुमेहग्रस्तांचं प्रमाण खूप जास्त आहे. मधुमेहपूर्व स्थितीत असलेल्या 60 टक्के लोकांना पुढील पाच वर्षांत हा आजार होऊ शकतो."
 
मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या दोन्ही संस्थांनी मिळून मागील दहा वर्षात हे संशोधन केलं आहे. यामध्ये भारतातील प्रत्येक राज्यातून वीस वर्षांवरील 1 लाख 13 हजार लोकांनी सहभाग घेतला होता.
 
या संशोधनासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2008 ची माहिती वापरण्यात आली आहे. सामाजिक निर्देशकांचे सर्वात व्यापक घरगुती सर्वेक्षण म्हणून सरकारद्वारे राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण केले जाते.
 
या संशोधनानुसार गोव्यात सर्वात जास्त म्हणजेच 26.4 टक्के लोकसंख्या मधुमेहाने ग्रस्त आहे. यानंतर पुद्दुचेरीमध्ये 26.3 टक्के आणि केरळमध्ये 25.5 टक्के लोकांना मधुमेह आहे.
 
या संशोधनात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेशात मधुमेहाचं प्रमाण झपाट्याने वाढण्याचा धोका समोर आला आहे. आतापर्यंत या राज्यांमध्ये मधुमेहाचा प्रसार कमी होता.
 
संशोधनानुसार ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे.
 
बॉम्बे हॉस्पिटलचे डायबेटोलॉजिस्ट राहुल बक्षी सांगतात, "बदलती जीवनशैली, राहणीमानात सुधारणा, शहरांकडे स्थलांतर, कामाचे अतिरिक्त तास, बैठी कामं, ताणतणाव, प्रदूषण, खाण्याच्या सवयींमधील बदल आणि फास्ट फूडची सहज उपलब्धता या कारणांमुळे भारतात मधुमेहाचं प्रमाण वाढू लागलंय.'
 
डॉ. बक्षी सांगतात की, आता मधुमेह हा केवळ शहरी किंवा उच्च वर्गाचा आजार राहिलेला नाहीये.
 
"माझ्याकडे छोट्या शहरांमधून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या भागांमध्ये मधुमेह पूर्व प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर झाला असून लोकांना याचं लवकर निदान होत नाही."
 
डॉ.बक्षी सांगतात की, अलीकडच्या काळात तरुण रुग्ण देखील मोठ्या संख्येने त्यांच्याकडे येत आहेत.
 
ते म्हणतात, "मी अशी कित्येक प्रकरणं पाहिली आहेत की ज्यात रुग्णांच्या मुलांनी घरीच रक्तातील साखरेची पातळी तपासली असता ती खूप जास्त आढळली."
 
जगभरातील 11 प्रौढांपैकी एकाला मधुमेह आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, अंधत्व आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो. याशिवाय हात किंवा पायही कापावे लागतात
 
मधुमेह म्हणजे काय?
आपलं शरीर रक्तातील साखर शोषून घेण्यास असमर्थ ठरतं त्या स्थितीला मधुमेह असं म्हणतात.
 
म्हणजे आपण जे काही खातो त्यातील कर्बोदकांचं विघटन होऊन त्याचं शर्करेत (ग्लुकोजमध्ये) रूपांतर होतं.
 
यानंतर स्वादुपिंडातून इन्सुलिन नामक संप्रेरक स्त्रवतं. हे संप्रेरक आपल्या शरीरातील पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यास सांगते.
 
यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते.
 
पण इन्सुलिन स्त्रवणं बंद होतं तेव्हा मात्र आपल्या शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू लागतं.
 
टाइप 1, टाइप 2 मधुमेह म्हणजे काय?
मधुमेहाचे अनेक प्रकार असतात. पण टाइप 1, टाइप 2 आणि गर्भावस्थेतील मधुमेहाशी संबंधित प्रकरणांची संख्या जास्त असते.
 
टाइप 1 मधुमेहामध्ये तुमच्या स्वादुपिंडात इन्सुलिन संप्रेरक तयार होणं बंद होतं. यामुळे आपल्या रक्तात शर्करेचं (ग्लुकोज) प्रमाण वाढू लागतं.
 
हे असं का घडतं याचं कोडं आतापर्यंत शास्त्रज्ञांनाही उलगडलेलं नाही. पण अनुवांशिक किंवा विषाणूजन्य संसर्गामुळे असं होतं असावं असा अंदाज आहे.
 
मधुमेहग्रस्त रुग्णांपैकी जवळपास दहा टक्के रुग्ण हे टाइप 1 मधुमेहाने त्रस्त आहेत.
 
तेच टाइप 2 मधुमेहामध्ये स्वादुपिंडामध्ये आवश्यकतेनुसार इन्सुलिन तयार होत नाही किंवा संप्रेरक योग्यरित्या कार्य करत नाही.
 
मधुमेहाची लक्षणे काय आहेत?
जास्त तहान लागते
नेहमीपेक्षा जास्त लघवी होते, विशेषतः रात्री
थकवा जाणवतो
अचानक वजन कमी होते
तोंडात अल्सर येतो
डोळ्यांची दृष्टी कमी होते
जखम भरायला वेळ लागतो
ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, टाइप 1 मधुमेहाची लक्षणं अगदी लहान वयातच दिसू लागतात.
 
दुसरीकडे टाइप 2 मधुमेह मध्यमवयीन लोकांमध्ये (दक्षिण आशियाई लोकांसाठी 25 वर्षे) किंवा कुटुंबातील एखादा सदस्य मधुमेहाने ग्रस्त असेल तर होऊ शकतो. दक्षिण आशियाई देश, चीन, आफ्रो-कॅरिबियन, आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांना याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.
 
मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो का?
मधुमेह हा अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांवर आधारित आजार आहे.
 
पण तुमच्या रक्तातील शर्करेचं प्रमाण नियंत्रित करून तुम्ही मधुमेहापासून वाचू शकता.
 
यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करायला हवा.
 
सोबतच तुमच्या रोजच्या आहारात भाज्या, फळं, शेंगा आणि कडधान्यांचा समावेश करू शकता.
 
यासोबतच आरोग्यवर्धक तेल, बदाम, सार्डिन, सॅल्मन आणि मॅकरेल सारख्या माशांचा आहारात समावेश करता येऊ शकतो. कारण त्यात मोठ्या प्रमाणावर ओमेगा 3 असते.
 
व्यायामानेही रक्तातील साखरेची पातळी कमी करता येते.
 
ब्रिटीश नॅशनल हेल्थ सिस्टीमनुसार, लोकांनी आठवड्यातून अडीच तास एरोबिक व्यायाम प्रकार केला पाहिजे. यात वेगाने चालणे, पायऱ्या चढणे यांचा समावेश असतो.
 
जर तुमच्या शरीराचं वजन नियंत्रणात असेल तर तुम्ही रक्तातील साखरेची पातळी सहज कमी करू शकता.
 
दुसरीकडे, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आठवड्यातून 0.5 किलो ते 1 किलो वजन कमी करा.
 
यासोबतच हृदयविकार टाळण्यासाठी धूम्रपान करू नका आणि कोलेस्टेरॉलची पातळी तपासत राहणं महत्त्वाचं आहे.
 
न पैसे खर्च करता मधुमेहाचा धोका कमी करता येतो?
अर्ध्या तासाच्या अंतराने तीन मिनिटं चालल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते. ब्रिटनमधील एका छोट्या गटावर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
 
डायबिटीस चॅरिटी कॉन्फरन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, सात तासांच्या आत दर अर्ध्या तासाने तीन मिनिट चालल्याने टाईप 1 मधुमेह रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली होती. एकूण 32 रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला होता.
 
डायबिटीस यूकेच्या मते, या अॅक्टिव्हिटी स्नॅक्समुळे विनाखर्च मधुमेहाचा धोका कमी करता येतो.
 
डायबिटीस यूके मधील संशोधन प्रमुख डॉ. एलिझाबेथ रॉबर्टसन सांगतात की, टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी दररोज त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी मोजणं कंटाळवाणं काम असतं.
 
रॉबर्टसन म्हणतात, "हे अतिशय आश्चर्यकारक आहे. या निष्कर्षातून समजतं की, तुमच्या साध्या हालचालीने देखील तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते."
 
युनिव्हर्सिटी ऑफ संडरलँडशी संबंधित आणि या संशोधनाचे प्रमुख संशोधक डॉ. मॅथ्यू कॅम्पबेल सांगतात की, या साध्या व्यायामामुळे जो परिणाम दिसून आलाय त्यामुळे मी हैराण झालोय.
 
ते म्हणतात की, टाइप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी 'अॅक्टिव्हिटी स्नॅकिंग' ही मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. पुढे जाऊन ते नियमित व्यायाम करू शकतील. शिवाय इतर लोकांसाठी, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग ठरू शकतो.
 
संशोधकांच्या मते, काम सुरू असताना एका ठराविक अंतराने विश्रांती घेतल्यास मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
Published By -Smita Joshi