शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

वंध्यत्वासाठी होमिओपॅथी एक वरदान!

होमिओपॅथी उपचाराने वंध्यत्व असणा-या अनेक दाम्पत्यांना फायदा झाला आहे. आजच्या धावत्या युगात लग्न झालेल्या ४० टक्के जोडप्यांना वंध्यत्वाच्या तक्रारीला सामोरे जावे लागते.(डब्ल्यूएचओ नुसार) प्रामुख्याने वंध्यत्वाची विभागणी ४ प्रकारे केली जाते- पुरुष वंध्यत्व, स्त्री वंध्यत्व, स्त्री-पुरुष वंध्यत्व, अकारण वंध्यत्व. वंध्यत्वामध्ये ५८ टक्के स्त्रीमध्ये दोष असतो तर २५ टक्के पुरुषांमध्ये आणि १७ टक्के वंध्यत्वाची कोणतीच कारणे स्पष्ट करता येण्यासारखी नसतात. पुरुषामध्ये वंध्यत्वाची अनेक कारणे असतात, जसे की वीर्यामध्ये शुक्राणू नसणे, शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची गती कमी प्रमाणात होणे, शारीरिक संबंधाच्या बाबतीतील समस्या इत्यादी. स्त्रीमध्ये वंध्यत्वाची प्रमुख कारणे म्हणजे अनियमित मासिक पाळी, स्त्रीबीज न होणे, स्त्रीबीज न फुटणे, गर्भाशयातील जंतुसंसर्ग, शारीरिक संबंधाच्या समस्या, गर्भाशय नळीतील समस्या, अति प्रमाणात गर्भनिरोध गोळ्यांचे सेवन अशी अनेक कारणे असतात. वंध्यत्वाच्या १७ टक्के जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची कुठलीच कारणे निदर्शनास येत नाहीत. स्त्री-पुरुष दोघेही निर्दाेष असतात. 
उपचार पद्धती :

१. शस्त्रक्रिया : वंध्यत्वामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शस्त्रक्रिया टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण केला पाहिजे. गर्भाशय नलिका बंद असेल तर त्याचे कारण शोधून गरज असेल तरच शस्त्रक्रिया करून किंवा औषधोपचाराने इलाज करावा. बरेच डॉक्टर स्त्रीबीज, अंडाशयातील गाठी दूर्बिणीद्वारे फोडतात; परंतु विनाशस्त्रक्रिया त्या गाठीचा होमिओपॅथिक औषधोपचाने उपचार करून गर्भधारणा होऊ शकते हे आता सिद्ध झाले आहे.

२. औषधोपचार : बरेच डॉक्टर हार्मान्सचा वापर उपचारासाठी करताना आढळतात; परंतु अशा प्रकारच्या आधुनिक औषधाने आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात.ज्यामुळे आपली नैसर्गिक तत्त्वावर चालणा-या सायको-न्युरो-एंडोक्राईन सिस्टीमचे काम बिघडते आणि आपल्या आजाराचे स्वरूप बदलते व अधिक गुंतागुंतीचे होते. हे सर्व करण्याआधी जर आपण नैसर्गिक उपचार पद्धती अवलंबली तर आपल्याला नक्की फायदा होतो; परंतु वरील सर्व प्रयोग झाल्यानंतर आपण नैसर्गिक उपचार मार्ग अवलंबला तर ते अवघड असते. मात्र, अशक्य नसते. असे झाले नसते तर आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीशिवाय पर्यायच राहिला नसता. परिणामी आपण आपली आधोगती करून घेतली असती. हे सगळे टाळण्यासाठी जर आपण सुरुवातीपासूनच नैसर्गिक होमिओपॅथिक उपचार पद्धती स्वीकारली तर ही अधोगती नक्कीच होणार नाही.

होमिओपॅथिक औषधोपचाराने वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते व त्यांची गतीदेखील वाढते. त्याच प्रमाणे गर्भाशयातील जंतुसंसर्गदेखील कमी होतो. अनियमित मासिक पाळी नियमित होते. स्त्री अंडाशयातील गाठी कमी होऊन गर्भधारणादेखील राहते. स्त्रीबीज तयार होत नसेल किंवा फुटत नसेल तर त्यालादेखील फायदा होतो. तसेच काही स्त्रियांमध्ये गर्भधारणा होते; परंतु त्यांना गर्भपातासारख्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत जर गर्भधारणेअगोदरपासून होमिओपॅथिक उपचार घेण्यास सुरुवात केली तर त्याचा नक्कीच फायदा होतो. गरोदरपणात दिवस भरत आले की काही स्त्रियांना गर्भाशयातील पाणी कमी होण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा प्रसंगी बरेच डॉक्टर कृत्रिम प्रसूती करण्यास प्राधान्य देतात व रुग्ण त्यास तयार होतो.