मधुमेह आणि फळे
मधुमेह हा आजार असलेल्या व्यक्तींनी आहाराबाबत सजग राहाणे आवश्यक असते. फळांचे सेवन करताना काळजी घेतली पाहिजे अन्यथा या फळांच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. बर्याच जणांचा असा गैरसमज असतो की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्याने रक्तातील साखर वाढत नाही. फळे सेवन केलेली चालतात असे मानून मधुमेहाचे रुग्ण फळांचे सेवन करतात पण फळांमध्ये असलेली नैसर्गिक साखर हानीकारक ठरू शकते.
चेरी मधुमेहात हानीकारक :
चेरीमध्ये खूप जास्त साखर असते त्यामुळेच आईस्क्रीम आदी गोष्टी तयार करण्यासाठी चेरीचा वापर केला जातो. एका चेरीमध्ये सुमारे 8 ग्रॅम साखर असते त्यामुळे चेरीचे सेवन करताना काळजी घेतली पाहिजे आणि विशिष्ट प्रमाणातच चेरीचे सेवन केले पाहिजे. चेरीचे सेवनाने रक्तातील शर्करेची पातळी वाढवू शकते.
आंबा : आंबा हा वर्षातून एकदाच मिळणार्या फळांपैकीएक आहे आणि बहुतेकांना आंबा खूप आवडतो. परंतु त्यातही नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आंब्याचे सेवन करणे शक्यतो टाळले पाहिजे. सर्वसाधारणपणे एका आंब्यामध्ये 45 ग्रॅम इतकी नैसर्गिक साखर असते.
द्राक्षे : रक्तातील साखरेची पातळी योग्य राखायची असेल तर द्राक्षाचे सेवन करणे टाळावे. कारण द्राक्षही गोड असतात. एक कप द्राक्षांतून शरीरात 23 ग्रॅम साखर जाऊ शकते.
डाळिंब : डाळिंब रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवते परंतु त्यातही साखरेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे सेवन केल्यास मधुमेही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. एका साधारण आकाराच्या डाळिंबामध्ये 39 ग्रॅम पर्यंत साखर असते. मधुमेही रुग्णांना डाळिंबाचे सेवन टाळले पाहिजे.
लिची : हे फळही जास्त साखरेचे प्रमाण असलेल्या फळांपैकी एक आहे. त्यामुळे र्रतातील साखर वाढू शकते. एक कप लिची फळांमध्ये 29 ग्रॅम एवढी नैसर्गिक साखर असते.
मधुमेही रुग्णांनी वरील फळे टाळावी, तसेच कोणतेही इतर फळ सेवन करताना विशिष्ट प्रमाणातच सेवन करावे जेणेकरून रक्तशर्करेचे प्रमाण योग्य राहील. मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर कमी होऊ द्यायची नसते तशीच ती वाढूनही उपयोग नाही त्यामुळे ठरावीक वेळेला आहार सेवन करतानाही तो योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे.
विजयालक्ष्मी साळवी