गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

लिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी

झोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची सुरुवात ही या पेयांनी होते. पण आता आपल्याला याचा फेरविचार करावा लागू शकतो. कारण याचे शरीरावर होणारे परिणाम. त्यापेक्षा आपण सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्या शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. 
 
शरीर शुद्धीकरण : शरीरातील एन्झाईमच्या कार्यासाठी लिंबाचा खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतातील विषद्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात. लिंबू पाण्यामुळे रक्त, धमन्या यांतील विषद्रव्य शरीराबाहेर टाकण्यास मदत होते त्यामुळे यकृताचे कार्यात सुधारणा होते. तसेच डोकेदुखी आणि थकव्यावर लिंबूपाणी हा उत्तम पर्याय आहे. 
 
रोगप्रतिकार प्रणालीला उत्तेजन : आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीसाठी सी जीवनसत्त्व खूप महत्त्वाचे आहे. लिंबाच्या रसात सी जीवनसत्त्वाचे प्रमाण खूप जास्त आहे. जेव्हा आपल्याला ताण येतो तेव्हा सर्वात पहिल्यांदा सी जीवनसत्त्वाचे प्रमाण लवकर घटते. त्यामुळे आपल्याला ताण येतो किंवा तणावाच्या काळात तज्ज्ञ व्यक्ती आपल्याला सी जीवनसत्त्वाचे आहारातले प्रमाण वाढवायचा सल्ला देतात. 
 
पचनाला मदत : लिंबाच्या रसामुळे पचनास मदत होते कारण शरीराच्या पचनसंस्थेतील विषद्रव्य बाहेर पडतात त्याचबरोबर अपचनाची जी काही लक्षणे आहेत जसे छातीत जळजळ, पोटात वायू होणे, ढेकरा येणे आदी लक्षणेही कमी होतात. 
 
वजन कमी होण्यास मदत : लिंबामध्ये आणि इतर फळांमध्येही पेक्टीन नावाचा तंतुमय पदार्थ असतो त्यामुळे पोट भरल्याची भावना जाणवते. त्यामुळे एक पेलाभर लिंबूपाणी प्यायल्यास जेवण कमी जाईल त्यामुळे काही प्रमाणात उष्मांक कमी प्रमाणात पोटात जातील. 
 
महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंबु हे आम्लप्रकृतीचे असते त्यामुळे लिंबाचा रस नुसता न खाता तो पाण्यातून घेणे अधिक श्रेयस्कर. नाश्त्याच्या आधी 15 ते 20 मिनिटे आधी लिंबू पाणी पिणे अधिक चांगले.
 
डॉ. भारत लुणावत