मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By

कशात आहे परम आनंद?

रूजलेल्या बीमधून अंकुर वर आला. त्याने हातांची ओंजळ करत सूर्यदेवाला प्रकाशाचे दान मागितले. ते रोपटे हिरवेपणाने तरारले. त्याला घुमारे फुटू लागले. आभाळाने त्याला पाऊसपाणी पाजले. मातीने खाद्य दिले. वार्‍याने गोंजारले. पाखरांनी अंगाईगीते म्हटली आणि त्या रोपाला कळी आली. हळूहळू तिचे फुलात रूपांतर झाले. पण ते फूल सर्वांच्या उपकाराच्या ओझ्याने वाकून गेले.
त्याच्यावरील दवबिंदूंना पाहून वार्‍याने म्हटले, का रडतोस? फूल म्हणाले, सर्वांनी वाढवलं. पण मी कोणाला काही दिलं नाही याचं दु:ख होतंय. वारा म्हणाला, कशाला रडतोस? देण्याचं ज्याला वेड लागलंय त्यानं रडायचं नसतं. तुझा सुवास जगभर उधळून टाक. मध भुंग्यांना दे. तुझा मकरंद खाऊन जग तृप्त होईल. तुझ्याजवळ देण्यासारखं खूप आहे. तू फक्त संकल्प कर. देणं हेच आत्म्याचं लेणं.
 
तात्पर्य: सर्वस्व देण्यातच अंतरात्म्याचा आनंद आहे.