शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By वेबदुनिया|

महत्वाच्या पाक सल्ला

कोशिंबिरीसाठी लागणारे गाजर, बीट, कोबी, मुळा वगैरे मोकळ्या वेळात एकदाच २-३ दिवसाला पुरेल एवढे किसून फ्रीजमध्ये घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे म्हणजे त्यातील जीवनसत्त्वेही उडून जाऊन कमी होणार नाहीत व घाईच्या वेळेत पटकन पाहिजे तेवढी कोशिंबीर करून घेता येईल.

पालेभाज्या आदल्या दिवशी साफ करून ठेवाव्यात म्हणजे, आयत्या वेळी धुऊन व चिरून चटकन भाजी करत येईल.

आठवड्याला लागणारा नारळ एकदाच किसून फ्रीजमध्ये ठेवावा.

भाजलेल्या कांदा-खोबऱ्याचे वाटण एकदाच जास्तीच करून त्यात थोडे मीठ घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास १०-१५ दिवस चांगले राहू शकतो.

पोळीची कणीक मळूनही फ्रीजमध्ये ठेवल्यास आयत्या वेळी झटपट पोळ्या करता येतील.

पराठे करण्यासाठी गाजर, बीट, मुळा, कोबी किसून तो थोडा परतून घ्यावा व त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट व मीठ, लिंबू, साखर घालून परतून कोरडा करावा व हा अर्धवट कच्चा कीस डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. हा कीस ८-१० दिवस चांगला राहतो व मुलांना पाहिजे तेव्हा पोळीच्या पिठात भरून झटपट पौष्टिक पराठे करून देता येतील.

भाज्या झटपट होण्यासाठी छोटा २-३ लीटरच कुकर वापरावा. गवार, घेवडा, तोंडलीसारख्या सुक्या भाज्या करण्यासाठी भाजी कुकरामध्येच फोडणीला द्यावी व त्यात मीठ, गूळ, खोबरे घालून अर्धी वाटी पाणी घुणा कुकराला २ शिट्या काढाव्यात. अगदी ५ मिनिटांतच छान भाजी तयार होते. रस भाजी व उसळी करण्यासाठी बेताचे पाणी घालावे व ३ शिट्या काढाव्यात. (शिट्या जास्त काढल्यास भाजी जास्त शिजून कुस्करेल.) प्रेशर कुकरच्या वापरामुळे इंधन व वेळ दोन्हीची बचत होते.

डोसे व उत्तप्पाचे जास्तीचे पीठ करून २-३ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो व आयत्या वेळी डोसे व उत्तपे करू शकतो.

कोणत्याही भाज्या चिरण्यापूर्वी धुवाव्यात. भाज्या चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील जीवनसत्त्वे पाण्यातून निघून जातील.

रवा उन्हात वाळवून किंवा कोरडाच भाजून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावा. १-२ महिने चांगला राहील. अळ्या पडणार नाहीत व घाईगडबडीत रवा निवडण्याचा वेळ वाचेल.