शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

Love Tips : प्रेमाची गॅरेंटी!

हल्ली दीपेश काहीसा कावरलेला आणि हरवलेला दिसत होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याला विचारले.. परंतु तो काहीच बोलायचा नाही.. एकदम गप्प! कुठेतरी एकांतात राहायचा.. एकटक कुठे तरी पाहत राहायचा..! काय झाले दीपेशला? त्याच्या आई-वडिलांना चिंता वाटू लागली. आपला मुलगा अतिशय खट्याळ होता.. येता जाता कुणाचीही मस्करी करीत राहायचा.. आणि अलीकडे त्याला काय झाले? हेच त्याच्या पालकांना समजेना.. तसा तो नुकताच आपले ग्रॅज्युएशन संपवून एका खाजगी कंपनीत क्लार्क म्हणून लागलेला. आई-वडील तसे सधन म्हणून पैशाची ददात नव्हती.. येणारा पगार त्याला त्याच्या हौसमौजेसाठीच उपयोगी पडायचा. पालकांनाही कधी त्यात फारसे काही वावगे वाटले नाही.. परंतु सदा हसत खेळत राहणारा दीपेश अचानक चिडीचूप का राहिला? त्यांनी त्याच्या मित्र-मंडळीकडे चौकशी केली.. परंतु सुराग काही लागेना! त्यांनी त्यालाही खोदून खोदून विचारायाचा प्रयत्न केला होता.. परंतु त्यांनाही त्याने काहीच सांगितले नाही..
 
एकदा आईने त्याला जवळ घेतले.. डोक्यावरून हात फिरवला आणि हळूच विचारले.. 
 
'बाबारे पोरीचं काही लफडं नाही ना?'
 
दीपेश आईच्या कुशीत शिरून ओक्साबोक्सी रडू लागला.. आई जे काही समजायचे ते समजली.
 
'बरं बाळा, कोण आहे ती मुलगी? मी बोलते तिच्याशी!'
 
दीपेश रडतच म्हणाला,
 
'आता काहीच उपयोग नाही त्याचा.. ती लग्न करून निघून गेली..!'
 
'अरे, पण तिचे तुझ्यावर प्रेम होते ना?' आईने विचारले..
 
'हो.. पण तिचे लग्न ठरल्यावर मला म्हणाली.. तो मला हातावरच्या फोडाप्रमाणे जपेल.. श्रीमंत आहे!' त्याने स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.
 
'अरे, तिने प्रेम आणि संसार यातून संसार निवडला.. प्रेम आंधळं असतं.. परंतु पोरगी खूपच डोळस होती म्हणायची!' आईने थट्टेने म्हटले..! तो चिडला..
 
'इथे माझ्यावर संकट कोसळले आणि तुला थट्टा सुचते!
 
'अरे थट्टा करू नको तर काय? तिने भविष्याचा वेध घेतला आणि योग्य पर्याय निवडला.. तुझ्याबरोबर तिने का लग्न करावे असे तुला वाटत होतं?'
 
'माझं तिच्यावर खूप प्रेम होतं..'
 
'तू कमवतोस किती?'
 
'कमवण्याचा आणि प्रेमाचा संबंध काय?'
 
'इथेच तर चुकतं तुम्हा तरुणांचं.. परक्याची पोरगी घर सोडून येणार तर तिला संपूर्ण आयुष्य काढण्यासाठी गॅरेंटी नको काय? तुम्हाला प्रेमाची गॅरेंटी हवी! पण तिला आयुष्य सुखाचे जाईल याची गॅरेंटी नको काय? अरे नुसत्या प्रेमाने पोट भरत नसते.. त्यासाठी पैसाही लागतो.. प्रेम केवळ जेवणातल्या लोणच्यासारखे असले तरी पुरे असते राजा!' प्रॅक्टिकल अनुभव असलेल्या आईने सल्ला दिला आणि त्याचे डोळे खाडकन उघडले! महिनाभर कामावर दांडी मारलेला दीपेश आता कामावर निघाला! कित्येक दिवसांनंतर आपल्या मुलाचा हसरा चेहरा बघून आई-वडिलांनाही बरे वाटले!
 
सन्ना मोरे