शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 21 जुलै 2018 (14:33 IST)

मीच मला सांगतो

झाली साठी,येईल सत्तरी
करत नाही मी चिंता
प्रत्येक दिवस मजेत जगतो 
वाढवत नाही गुंता 
 
वय झालं म्हातारपण आलं
उगीच बोंबलत बसत नाही
विनाकारण बाम लावून
चादरीत तोंड खुपसत नाही
 
तुम्हीच सांगा फिरायला जायला
वयाचा संबध असतो का ?
नेहमी नेहमी घरात बसून 
माणूस आनंदी दिसतो का ?
 
पोटा पाण्यासाठी पोरं
घर सोडून जाणारच 
प्रत्येकाच्या आयुष्या मधे
असे रितेपण येणारच 
 
करमत नाही करमत नाही
सारखे सारखे म्हणत नाही 
मित्रां सोबत दिवस घालवतो
घरात कुढत बसत नाही
 
घरातल्या घरात वा बागेत
हिंडाय-फिरायला जातो 
वय जरी वाढलं तरी 
रोमँटिक गाणं गातो 
 
गुडघे गेले , कंबर गेली
नेहमी नेहमी कण्हत नाही 
आता आपलं काय राहिलं 
हे बोगस वाक्य म्हणत नाही
 
पिढी दर पिढी चाली रितीत
थोडे फार बदल होणारच 
पोरं पोरी त्यांच्या संसारात 
कळत नकळत गुंतणारच 
 
तू-तू , मैं-मैं  , जास्त अपेक्षा
कुणाकडूनही करत नाही
मस्तपैकी जगायचं सोडून
रोज रोज थोडं मरत नाही
 
स्वतःलाच समजून घेतो
पुढे पुढे चालत राहतोे
वास्तू तथास्तु म्हणत असते
हे उमजुन मी जास्तीच जगत असतो