गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By सौ. माधुरी अशिरगडे|

शब्दांशी लडिवाळ खेळ करणारा संदीप खरे

मराठी कवितेतील सध्याचे आघाडीचे नाव म्हणजे संदीप खरे. सार्‍या तरूणाईला संदीपच्या कवितांचे वेड लागले आहे. त्याची येणारी प्रत्येक कॅसेट, सीडी तुफान खपते आहे. शिवाय त्याच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला गर्दीही वाढत आहे. एवढ्या लहान वयातच आयुष्यावर बोलणार्‍या संदीपविषयी...


प्रश्न - संदीप, कविता तुझ्याकडे केव्हा व कुठून आली ?
उत्तर - मी साधारणतः चौथीत वगैरे असल्यापासूनच कविता करतोय. ही आजोबांकडून मिळालेली देण.

प्रश्न - तुझी कविता जात्याच एक सुजाणपण घेऊन येते. प्रेमकवितांच्या संदर्भात 'मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात, मन नाजुकशी मोतीमाळ, तुझ्या नाजुकशा गळ्यात' किंवा 'कसे सरतील सये, माझ्या‍‍विना दिस तुझे, सरतांना आणि सांग सलतील ना' अशा ओळी तुझा स्वानुभव की कल्पनाविलास?
उत्तर - अर्थातच माझी कविता संपूर्णपणे स्वानुभवाधिष्ठित आहे. माझा प्रेमविवाह आहे. 'कसे सरतील सये......' ही कविता आम्ही मधल्या काळात एकमेकांपासून दूर होतो, तेव्हाची आहे. त्या विरहाच्या उत्कटतेतूनच हे आलं.

प्रश्न - संदीप तुला कॅसेटच्या माध्यमातून रसिकाभिमुख व्हावंसं का वाटलं? पुस्तकाच्या माध्यमास तुला प्राथमिकता का द्यावीशी वाटली नाही?
उत्तर - मी मार्केट मिशनरीजमध्ये फ्री लान्स कॉपी-रायटर म्हणून काम करतो. अॅड क्षेत्रात असल्यामुळे रेकॉर्डिंगच्या माध्यामातून लोकांपर्यंत जाणं माझ्या दृ‍ष्टीने अधिक सोयीस्कर होतं. जे मी सहज करु शकतो तेच मी आधी करीन ना?

प्रश्न - तुझ्या कवितेचा पोत कुणासारखा आहे अस तुला वाटतं?
उत्तर - मी आरती प्रभू, ‍हेमंत गोविंद जोगळेकर (पुणे) या कवींचा चाहता आहे. त्या इंटेंसिटीने मी कविता करतो.

प्रश्न - तुझं शिक्षण कुठवर झालंय? त्याचा तुझ्या छंदांशी थेट संबंध येतो का?
उत्तर - मी इले‍क्ट्रीकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलाय. माझं क्षेत्र जाहिरातीचं आहे. जाहिरातीच्या परफेक्शनासाठी मला माझ्या शिक्षणाचा खूप छान उपयोग होतो.

प्रश्न - आणि गाणं तुझ्यात कुठून, कसं आलं?
उत्तर - संगीत तर घरातूनच आलय्. माझे आजोबा उत्तम तबलावादक ‍होते व चुलत आजोबा उत्तम गाणं म्हणतात.

प्रश्न - तुला जाहिरातीसाठी तुझं कवितेचं टॅलन्ट कितपत कामाला येतं?
उत्तर - कवितेचा मला माझ्या व्यवसायात छान उपयोग करुन घेता येतो. मी लोकसत्तासाठी, डीएएसकेसाठी जाहिराती बनविल्या आहेत. त्या खूप गाजल्या. इंजिनिअरींग व काव्यगुण यांचं कॉम्बिनेशन मला व्यवस्थित साधता येतं.

प्रश्न - 'आयुष्यावर बोलू काही' हा कार्यक्रम करण्याची संकल्पना कशी जन्माला आली. एकूणच याचं स्‍वरुप काय?
उत्तर - एक नवा प्रयोग करण्याची खुमखुमी माझ्यात व सलील ( डॉ. सलील कुलकर्णी) दोघांतही होती. आमचे तसे छान ट्युनिंग जुळते. तो देखील प्रतिभावंत संगीतकार-गायक आहे. लोकांना छान असेल तर नवेही आवडते याचा प्रत्यय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आला.

आयुष्यावर बोलू काही, दिवस असे की, कधी हे कधी ते या ध्वनिफितीतून रसिकांचा अंदाज येत नाही. रसिकांशी थेट संवाद साधत होणारा हा प्रवास आम्हाला खूप सुखद व मोलाचा वाटतो. आयुष्याशी निगडित अशा अनेक विषयांचे धागे या कार्यक्रमात एकत्रित गुंफले आहेत.

काही गाणी तबला पेटीवर, काही गद्यशैलीत व बरीचशी गाऊन सादर केली जातात. काव्यातूनच निवेदनही ओघाने होत असते. काही गाणी आम्ही म्युझिक ट्रॅकवर सादर करतो. शिवाय प्रत्येक कार्यक्रमागणिक मी माझी एक नवीन कविता व सलील एक नवी चाल पुन्हा नव्याने सादर करतो.

प्रश्न - आजकालच्या रिमिक्सबद्दल तू काय म्हणतोस?
उत्तर - खरं तर मी 'नो कॉमेंट्‍स' असचं म्हणेन. पण सध्या प्रसारमाध्यमांतून सेक्स व ह्युमर हे सर्वाधिक विकलं जातं. आपण इंग्रजांचं अंधानु्करण करतो. आपली मानसिकता अनुकरणाची आहे. शिवाय हे अनुकरणही दिशाभूल करणारं आहे. ओरिजिनॅलिटीचा सर्वस्वी अभाव असेल तर आपण कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, हे या लोकांना कळत नाही.

प्रश्न - तुझ्या यशस्वीतेचा तुझ्यासाठीचा मंत्र कोणता?
उत्तर - आपल्या निर्मितीतून सेलेबिलीटी हवी. वेगवेगळे मूड्‍स हवेत. त्यासाठी आयुष्याला वेगवेगळ्या अंगानं भिडता आलं पाहिजे. ओरिजिनॅलिटी ही तर यशस्वीतेची प्राथमिक मागणी आहे. अवलोकन हवे. बस मग तुम्हाला मागे वळून बघावे लागत नाही.

प्रश्न - जाहिरातीचे तंत्र कसे असते?
उत्तर - कमीत कमीत शब्दात छान लिहिणे हा जाहिरातीचा आत्मा. आशय मोठा आकार छोटा हा मंत्र आहे यशस्वी जाहिरातीचा. मी हिंदीतही जाहिराती करतो. मला राष्ट्रीय स्तरावरील रापा पुरस्कार त्यासाठी मिळाला आहे. (रापा - रेडिओ अँड टीव्ही प्रॅक्टीशनर्स असोसिएशन). वारणा, कावासाकी बजाज, परांजपे स्कीम्स् व डीएसके बिल्डर्स इ. मान्यवर संस्थांसाठी मी अनेक जाहिराती तयार केल्या आहेत.

संदीप तुझ्या आयुष्यातील पुढल्या उज्वल भवितव्यासाठी अनेक शुभेच्छा

- माधुरी अशिरगडे
नागपूर
***