शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Updated : सोमवार, 18 मे 2020 (17:34 IST)

रत्नाकर मतकरी : कोरोना व्हायरसमुळे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककाराचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार आणि रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं रविवारी (17 मे) रात्री निधन झालं. ते 81 वर्षांचे होते.
 
चार दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, असं सांगितलं जात आहे. मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.
 
नाटक, बालनाट्य, कथा गूढकथा, ललित लेखन असे वेगवेगळे साहित्यप्रकार रत्नाकर मतकरी यांनी हाताळले होते. मतकरी यांनी 70 नाटकं आणि 22 बालनाट्यं लिहिली.
 
'आरण्यक', 'माझं काय चुकलं?', 'जावई माझा भला', 'चार दिवस प्रेमाचे', 'घर तिघांचं हवं', 'इंदिरा' ही त्यांची काही गाजलेली नाटकं होती. 'अलबत्या-गलबत्या', 'निम्मा-शिम्मा राक्षस' यांसारखी बालनाट्यंही त्यांनी लिहिली होती.
 
रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'इन्व्हेस्टमेन्ट'या चित्रपटाला 2013 साली सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.
 
गूढकथा हा साहित्यप्रकारही त्यांनी मराठीमध्ये रुजवला. 'गहिरे पाणी', 'खेकडा', 'मध्यरात्रीचे पडघम', 'निजधाम' हे त्यांचे गूढकथासंग्रह आहेत. त्यांच्या 'गहिरे पाणी' या कथासंग्रहावर आधारित मालिकाही गाजली होती.
 
गूढकथा आकृतीबंधाच्या या शक्यताच समीक्षकांच्या ध्यानात आल्या नाहीत. त्यामुळे गूढकथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही, अशी खंतही रत्नाकर मतकरी यांनी व्यक्त केली होती. मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मानवी संबंध, सामाजिक प्रश्न अशा वेगवेगळ्या पातळीवर गूढकथेच्या माध्यमातून आशय अभिव्यक्त करता येतो, असं रत्नाकर मतकरी यांचं मत होतं.
 
महाराष्ट्राचे साहित्य'रत्न' निखळले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
"ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी मनाला खूप वेदना देऊन जाणारी आहे. ते साहित्य विश्वातले अमूल्य असे रत्न होते. त्यांनी त्यांच्या साहित्यातून, नाटकांमधून लहान मुलांना, मोठ्यांना निखळ आनंद दिला. आमच्या पिढीतल्या लहानांचे भाव विश्व साकारले, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केले. एकीकडे अनेक मानाचे पुरस्कार मिळत असतांनाही रत्नाकर मतकरी हे रसिकांना निखळ आनंद देण्यासाठी सच्चेपणाने नवनवीन साहित्य लिहीत गेले," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली वाहिली.
 
त्यांचे निधन निश्चितपणे धक्का देणारे आहे. महाराष्ट्राचे साहित्य'रत्न' आज निखळले, असंही उद्धव यांनी म्हटलं.
 
'बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड'
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
 
मराठी नाटक मध्यमवर्गासाठी लिहिणारे वसंत कानेटकरांनंतरचे नाटतकार म्हणजे रत्नाकर मतकरी. ते आनंददायी संदेश देणारे नाटककार होते. त्यांच्या भयकथा मला खूप आवडतात. बालरंगभूमीवरचं त्यांचं काम अद्वितीय आहे, अशा भावना अभिनेते वैभव मांगले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केल्या.
 
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी "मतकरी यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही. वयाच्या सतराव्या वर्षी आकाशवाणीवरुन सुरु झालेली विपुल कारकीर्द मराठी माणसाच्या कायम स्मरणात राहील. रत्नाकर मतकरींना भावपूर्ण आदरांजली!" या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले, "ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी (वय ८१) यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. त्यांच्या जाण्याने बालनाट्य, प्रायोगिक नाटकं, गूढ कथालेखक असं बहुआयामी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली."
 
मतकरी यांचा साहित्यप्रवास
मतकरी यांनी 1955 साली 'वेडी माणसं' ही त्यांची पहिली एकांकिका लिहिली. ती मुंबई आकाशवाणी केंद्रावरून सादर करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य असे सर्व साहित्यप्रकार हाताळले.
 
त्याचबरोबर त्यांनी 'सूत्रधार' या संस्थेच्या माध्यमातून काही नाटकांची निर्मितीही केली होती. बालनाट्य चळवळीतलं त्यांचं योगदानही मोठं आहे. सुमारे तीस वर्षे त्यांनी बालनाट्यांची निर्मिती केली.
 
2001 साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
 
रत्नाकर मतकरींचं साहित्य-
नाटकं-
 
अजून यौवनात मी
आम्हाला वेगळं व्हायचंय
आरण्यक
इंदिरा
एकदा पाहावं करून
जावई माझा भला
खोल खोल पाणी
घर तिघांचं हवं
चार दिवस प्रेमाचे
दादाची गर्लफ्रेंड
जादू तेरी नजर
तन-मन
प्रियतमा
शूऽऽ कुठं बोलयचं नाही
बालसाहित्य-
 
अलबत्या गलबत्या
निम्मा-शिम्मा राक्षस
आरशाचा राक्षस
अलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर
अचाटगावची अफाट मावशी
एक होता मुलगा
ढगढगोजीचा पाणी प्रताप
धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी
सरदार फाकडोजी वाकडे (बालसाहित्य)
माकडा माकडा हुप
गूढकथा-
 
गहिरे पाणी
खेकडा
मृत्यूंजयी
मध्यरात्रीचे पडघम
संदेह
कबंध
फाशी बखळ
ऐक...टोले पडताहेत
बाळ अंधार पडला
निजधाम