मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (21:57 IST)

‘पियूची वही’कादंबरीला ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’जाहीर

sangita barve
प्रसिद्ध लेखिका संगीता बर्वे यांना ‘पियूची वही’या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’जाहीर झाला आहे. अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 22 प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली. 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी 14 नोव्हेंबर 2022 या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल. या पुरस्कारांमध्ये कोकणी भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या ‘मयुरी’या कादंबरीसही बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या संगीता बर्वे या उत्तम कवयित्री आणि बाललेखिका आहेत. ‘मृगतृष्णा’आणि ‘दिवसाच्या वाटेवरून’हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची बाल साहित्यलेखिका म्हणूनही वेगळी ओळख आहे. ‘गंमत झाली भारी’,‘झाडआजोबा’,‘खारुताई आणि सावली’,उजेडाचा गाव’हे त्यांचे मुलांसाठीचे कवितासंग्रह असून ‘पियूची वही’ही कांदबरी विशेष प्रसिद्ध आहे. याच कादंबरीवर आधारित ‘संगीत पियूची वही’हे बालनाटयही त्यांनी लिहीले आहे. ‘अदितीची साहसी सफर’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. 
 
संगीता बर्वे यांच्या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार, इंदिरा संत योजनेंतर्गत उत्कृष्ट वाचननिर्मिती पुरस्कार, विशाखा पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार, अनन्वय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
रोजनिशी लिहिण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे, या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळया गोष्टींची होणारी ओळख हे ‘पियूची वही’ या कादंबरीचा विषय आहे.