शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By अभिनय कुलकर्णी|

इगतपुरीची घाटनदेवी

नाशिक- मुंबई रस्त्यादरम्यान इगतपुरीच्या पुढे घाट आहे. या घाटातच 'घाटनदेवी' वसली आहे. हे मंदिर अतिशय निसर्गरम्य वातावरणात आहे. निसर्गाची चौफेर उधळण असलेल्या या भागात देवीचे हे वसतीस्थान आणखी मनोरम वाटते. ही देवी घाटातच वसली असल्यानेच तिला घाटनदेवी असे म्हणतात. घाटातून जाणार्‍यांचे ती रक्षण करते अशी स्थानिकांची भावना आहे.

WD
हे मंदिर डोंगरांमध्येच वसले आहे. त्याच्या आजूबाजूला हरिहर, दुर्वर, उतवड व त्र्यंबक हे डोंगर जणू संरक्षणासाठीच उभे आहेत. मंदिर आता आधुनिक रूपात असले तरी त्याला इतिहासही मोठा आहे. दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांचे पाय या मंदिराला लागले होते.

घाटनदेवी महालय, संकटसमयी भक्तांच्या मदतीला धावणारी व नवसाला पावणारी म्हणून घाटनदेवीचा नावलौकिक आहे. दुर्गासप्तशतीत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघाटा, कृष्णाचा, चंद्रघाटा, स्कंदमाता, कल्याणी, कालरात्री, महागिरी सिद्दी यातील पहिले रूप शैलपुत्री म्हणजे घाटनदेवी. वज्रेश्‍वरीहून निघून देवी भीमाशंकरला निघाली. वाटेत विश्रांती घेतली व येथेच स्थिर झाली. परिसरात नैसर्गिक व मनमोहक वातावरणामुळे मोहित होऊन थांबली. छत्रपती शिवाजी महाराज कल्याणचा खजिना लुटून घाटात आले होते व देवीची पूजा केल्याची नोंद आहे. पूर्वीचे मंदिर पडून गेले आहे. १९९६ पासून धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणीकृत आहे. या ट्रस्टमध्ये नऊ जण विश्‍वस्त असून, सामाजिक कार्यकर्ते सतीश चांदवडकर काम पाहतात. नवसाला पावणारी घाटनदेवी म्हणून प्रसिद्ध आहे.

WD
नवरात्रोत्सवात भाविकांची पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत गर्दी होते. महानवमी व विजयादशमीला गर्दीचा उच्चांक असतो. नवरात्र काळात यात्राही भरते. यात्रेत फिरते पाळणे, खेळण्यांची दुकाने, हॉटेल, प्रसाद स्टॉल असतात. मुंबई व नाशिकहून प्रवास करणारे भाविक येथे हमखास थांबून डोंगराच्या पार्श्‍वभूमीवर निसर्गसौंदर्याने नटलेल्या घाटनदेवीसमोर नतमस्तक होतात. या घाटातून जाता-येताना नमस्कार केल्याशिवाय कोणतीही गाडी समोरच्या रस्त्यावरून जात नाही, असा लौकीक आहे. याशिवाय लोक खास या देवीच्या दर्शनालाही येत असतात.

पाहण्यासारखे आणखी काही-
इगतपुरी येथे सत्यनारायण गोयंका यांनी स्थापन केलेले विपश्यना सेंटर आहे. या सेंटरमध्ये सामान्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक लोक विपश्यनेसाठी येत असतात. या संस्थेची वेबसाईट असून त्यावर नोंदणी करून येथे विपश्यनेसाठी येता येते. याशिवाय या परिसरात अनेक किल्ले आहेत. हरीहर गड, हरिश्चंद्र गड, कळसूबाई (महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर) येथून जवळ आहे.

कसे पोहोचाल?
इगतपुरीपासून हे मंदिर अगदी जवळ आहे. इगतपुरी मुंबई-आग्रा महामार्गावर आहे. नाशिकहून इगतपुरी ४५ किलोमीटरवर आहे. मुंबईहून ११० किलोमीटर आहे.

इगतपुरी हे मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन आहे. मनमाड-नाशिकमार्गे जाणार्‍या गाड्या इगतपुरीला थांबतात.

इगतपुरीला येण्यासाठी मुंबई हे जवळचे विमानतळ आहे.