शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

विद्यादायिनी कोल्लूरची मुकांबिनी

- नागेंद्र त्रासी

WDWD
कर्नाटकातील उडूपी जिल्ह्यात सुपर्णिका नदीच्या किनारी कोल्लूर येथील मुकांबिकेचे मंदिर म्हणजे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या देवीची कृपा हजारो भक्तांवर आहे, म्हणूनच देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक या देवीचे दर्शन घेण्यासाठी येथे येत असतात. विजयादशमीचा दिवस येथे विद्यादशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलांच्या शिक्षणाचा आरंभ व्हावा या हेतूने 'विद्यारंभम' केले जाते. मुलाच्या शिक्षणाचा आरंभबिंदू म्हणूनही या उत्सवाला महत्त्व आहे.

पौराणिक महत्त्
WDWD
कोल्लूर किंवा कोलापूरा हे नाव ऋषी कोला महर्षी यांच्या नावावरून पडले. कोला महर्षींनी कामहसूरा या राक्षसाला सर्व शक्ती मिळवून देण्यासाठी महालक्ष्मीचा आशीर्वाद कठोर तपश्चर्येद्वारे प्राप्त केला. शक्ती प्राप्त झालेल्या या राक्षसाने अमरत्वाचा वर मिळविण्यासाठी शिवाची आराधना सुरू केली. हे लक्षात येताच देवीने या राक्षसाला मुका केले. त्यानंतर तो मुकासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. मुळातच राक्षसी प्रवृत्तीचा असल्याने त्याने देवदेवतांना त्रास देणे सुरूच ठेवले होते. अखेरीस त्याला धडा शिकविण्यासाठी देवीने त्याला त्याच्या सैन्यांसह ठार केले. मुकासूराने तत्पूर्वी शिवाकडून वर मिळवला होता, की हरी किंवा हर यांच्यापैकी कुणीही त्याला ठार मारू शकणार नाही. म्हणून देवीकडून त्याला यमसदनास पाठविण्यात आले.

कोल्लूरची देवी मुकांबिका मंदिराच्या मुख्य गर्भगृहात ज्योतिर्लिंग स्वरूपात आहे. मंदिरातील पाणी पीठा या पवित्र जागी सुवर्णरेषेचे वलय असलेला पिंडीस्वरूप पाषाण आहे. श्रीचक्रामध्ये जसे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात, तसेच या पाषाणात आदिशक्तीचे वास्तव्य असते, अशी श्रद्धा आहे.

WDWD
गर्भगृहात प्रकृती, शक्ती, काली, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती आहेत. पाषाणाच्या पश्चिमेला देवीची पंचधातूची सुंदर मूर्ती आहे. मिरवणुकीवेळी हीच मूर्ती पालखीत ठेवली जाते. ही देवी पद्मासनात बसली असून तिच्याकडे शंक, चक्र आणि अभय हस्त आहे.

मंदिराच्या आवारात इतरही देवदेवता आहेत. दक्षिणेला दशभूजा गणपती आहे. पश्चिमेला आदी शंकराचार्यांचे तापस पीठ आहे. त्याच्या समोर आदि शंकराचार्यांचा पांढर्‍या दगडातील पुतळा आहे. त्यावर शंकराचार्यांनी लिहिलेल्या अक्षरवाड्मयातील काही संक्षिप्त भाग लिहिलेला आहे. शंकराचार्यांच्या पीठाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला मंदिराच्या व्यवस्थापनाकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. वायव्य दिशेला यज्ञशाळा आणि वीरभद्रेश्वराचा पुतळा आहे. पुराणातील कथेनुसार, देवीने मुकासूराशी युद्ध आरंभले तेव्हा वीरभद्राने तिला सहाय्य केले होते. वीरभद्राची विभूती पूजा केली जाते.
WDWD
मंदिराच्या बाह्य आवारात बळीपीठ, ध्वजस्तंभ आणि दीपस्तंभ आहे. ध्वजस्तंभावर सोनेरी आवरण आहे. कार्तिक महिन्यात येथे होणारा दीपोत्सव हा बघण्यासारखा सोहळा असतो. या दिवशी दीपस्तंभातील सर्व दिवे पेटवले जातात. जणू आसमंताला सोनेरी किनार लाभते.

येथे रोज भाविकांसाठी अन्नदान होते. त्याचा लाभ हजारो भाविक घेतात. या मंदिराच्या बाहेर पश्चिमेच्या रस्त्यावर त्र्यंबकेश्वर, श्रृंगेरी आणि मरियम्मा यांची मंदिरे आहेत. येथे वैदिक शिक्षण देणार्‍या अनेक पाठशाळा आहेत. कांची कामकोटी पीठाद्वारे चालविल्या जाणार्‍या श्री जयेंद्र सरस्वती वैदिक पाठशाळेत मुलांना वेदांचे मोफत शिक्षण दिले जाते.

सण- उत्सव-
विद्यादशमीव्यतिरिक्त चंद्रम युगडी (नवे चंद्रवर्ष), राम नवमी, नवरात्री, सूर्य युगडी (नवे सौरवर्ष), मुकांबिका जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, कृष्णाष्टमी, नरका चतुर्दशी हे सण येथे उत्साहात साजरे केले जातात.

कोल्लूरला कसे जावे-
कोल्लूर हे कर्नाटकातील सागरी किनार्‍यावर असलेल्या उडुपी जिल्ह्यात वसले आहे. बंगळूरपासून ते पाचशे किलोमीटरवर आहे. मंगळूरपासून ते १३५ किलोमीटरवर आहे. मंगळूर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाशिवाय जलमार्गानेही जोडले गेले आहे. तेथून येथे येणे सहज शक्य आहे. उडूपीपासून ते ६५ आणि कुंडनपूरपासून ते चाळीस किलोमीटरवर आहे. कुंडनपूर हे येथून जवळचे रेल्वे स्टेशन आहे. मंगळूर हे जवळचे विमानतळ आहे. भाविकांसाठी येथे भक्तनिवासात परवडेल अशा दरात रहायची सोय आहे.

फोटो गॅलरी पहा...