गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. साहित्य संमेलन २००९
Written By वेबदुनिया|

संमेलनात सुनील मेहतांना धक्काबुक्की

- किरण जोशी

वादाचे ग्रहण लागलेल्या साहित्य संमेलनातील वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकही आज पुन्हा एक वाद जन्माला घातला गेला. या बैठकीत डॉ. आनंद यादव यांचे भाषण देण्याची मागणी करण्यासाठी गेलो असता आपणास धक्के मारून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता यांनी केल्याने महाबळेश्वरचे थंड हवामान चांगलेच तापले आहे.

या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांना पाचारण करावे लागले आहे. या वागणुकीमुळे संतप्त झालेल्या मेहता यांनी हे संमेलन बंद करावे आणि पर्यायी संस्था स्थापन करून नवे संमेलन घ्यावे अशी मागणी केली आहे. इथे आलेल्या प्रकाशकांनीही मेहता यांना समर्थन दिले असून उद्यापासूनचे संमेलन थांबवावे अशी मागणी केली आहे. अध्यक्ष नसलेल्या संमेलनाला काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. आनंद यादव यांनी संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखवावे अशी मागणी कालपासून केली जात आहे. उद्घाटनावेळी हे भाषण पत्रकारांना दिले जाईल, असे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, तरीही ते भाषण दिले गेले नाही. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी श्री. मेहता आज महामंडळाच्या बैठकीत गेले असता त्यांना हे भाषण छापलेलेच नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यावर हे भाषण छापल्याची आपल्याला माहिती असून ते महाबळेश्वरमधीलच एका हॉटेलमध्ये ठेवले असल्याचे आपल्याला कळाल्याचे मेहता यांनी सांगितले. त्यावर महाबळेश्वरच्या संयोजन समितीने या भाषणाचे गठ्ठे आपल्याकडे दिले नसल्याचे श्री. ठाले-पाटील यांनी सांगितले. मात्र, संयोजन समितीने हे भाषण आपण साहित्य महामंडळाच्या ताब्यात दिल्याचे स्पष्ट केले आहे.

या सगळ्या गोंधळानंतर मेहता यांना या बैठकीबाहेर काढण्यात आले. या वागणुकीने संतप्त झालेल्या मेहता यांनी अध्यक्षांविना होणारे हे संमेलन नसल्याचे सांगून पर्यायी महामंडळा स्थापून, त्यावर साहित्यातील अधिकारी व्यक्ती नेमून नव्याने संमेलन घ्यायला हवे असे म्हटले आहे. महामंडळाचे पदाधिकारी या सगळ्या संमेलनावर विळखा घालून बसलेले असून त्यांना तेथून हाकलायला हवे असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाबळेश्वर संमेलनात उडालेल्या गोंधळाबद्दल अनेक मान्यवर साहित्यिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांनी महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पदावरून जायला पाहिजे असे सांगून, सुमार बुद्धिच्या आणि साहित्यिक नसणार्‍या ठाले-पाटलांना या पदावर रहाण्याचा काहीही हक्क नाही. त्यांनीच हा सर्व गोंधळ घातल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.