शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (12:08 IST)

एक अनुभव - एक धडा

आपल्याला ज्या गोष्टी दिसतात त्या तशाच असतात असे नाही. जसे दिसते तसे नसते म्हणून जग फसते असे आपण नेहमी म्हणत असतो किंवा इतरांकडून तसे अधूनमधून ऐकायलाही मिळते. या म्हणीचा उपयोग अनेकजण एखाद्याचे सद्गुण किंवा दुर्गुण दाखवण्यासाठी करतात. असो, मी देखील ही म्हण शेकडो वेळा ऐकली आहे किंवा इतरांना सांगितली आहे पण तिचा अर्थ त्या दिवसापूर्वी इतका अधिक स्पष्ट कधीच कळाला नव्हता. 
 
त्या दिवशी दर महिन्याप्रमाणे टेलिफोनचे बिल भरण्यासाठी टेलिफोन ऑफिसमध्ये गेलो होतो, केवळ पाच - सात जण रांगेत होते, काही किरकोळ तांत्रिक अडचण असल्याने बिले गोळा करायला वेळ लागत होता. अचानक तेथे असलेल्या एका फलकाकडे लक्ष गेले. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा असतील तर त्यांचा क्रमांक बिलाच्या पाठीमागे लिहिण्याच्या सूचना त्यावर लिहिल्या होत्या. नोटांचा क्रमांक लिहिणे भाग असल्याने खिशात पेन शोधू लागलो, पण पेन नव्हता. शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे पाहून चेह-यावर स्मित हास्य आणून म्हटले, “सर, प्लीज पेन द्याल का?” त्या व्यक्तीकडे पेन नसल्याने त्याने हातानेच इशारा करत पेन नसल्याचे सुचवले. त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडून पेन मिळावा म्हणून या व्यक्तीला पुन्हा विनंती केली, “सर, प्लीज त्यांच्याकडून पेन घेऊन द्याल का?” पेन मिळताचक्षणी थॅक्यू सर! म्हणून चेह-यावर पुन्हा स्मित हास्य आणले, पण या माणसांशी सर, प्लीज, आणि थॅक्यू या शब्दांचा वापर करून मी बोलत आहे तरी देखील त्याने एकही शब्द उच्चारला नाही याचे नवल वाटत नोटांचा क्रमांक लिहून पेन परत देताना परत थॅक्यू सर! हे शब्द तोंडातून बाहेर पडले, पण या व्यक्तीच्या चेह-यावर काही भाव नाही, तोंडातून एक शब्द निघाला नाही हे पाहून लोक किती गर्विष्ठ व शिष्टाचारहीन असू शकतात असे विचार या शेजारी बसलेल्या व्यक्तीबदल अगदी काही क्षणात येऊन गेले कारण मला त्याच्या वर्तनातून तसेच दिसून येत होते. त्या अनोळखी व्यक्तीविषयी मनात आलेल्या नकारात्मक विचाराने मी लगेच निराश झालो. त्याच्या वर्तनाचा आणि स्वभावाचा लगेच न्याय केला की तो शिष्टाचार नसलेला व्यक्ती आहे. हे विचार मनात असतांनाच तो रांगेत माझ्यापुढे असल्याने बिल भरण्यासाठी पुढे गेला, त्याच्या चेह-यावरील भाव तसेच होते. कॅशिअरने हाताने इशारा करून त्याच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? याची चौकशी केली, यानेही हातवारे करूनच सुट्टे पैसे नसल्याचे उत्तर दिले.... ते दोघे एकमेकांना बहुतेक ओळखत असावेत म्हणून त्यावेळी त्यांनी आणखी काही गोष्टीबद्दल हातवारे करून एकमेकांशी संवाद केला. 
 
तो व्यक्ती मुका आणि बहिरा होता हे लक्षात येताच, मला क्षणभर काही सुचलेच नाही, माझं डोकं अगदी शांत झालं, पाय थरथरू लागले, त्याच्याविषयी जो मी वाईट विचार केला होता त्याचे फार दु:ख वाटले. त्याच्यासाठी वापरलेली विशेषणे, गर्विष्ठ, शिष्टाचारहीन ही माझ्यासाठीच होती असे वाटले कारण मी त्याची कोणतीही पार्श्वभूमी जाणून न घेता, तो योग्य वर्तन का करत नाही याचा विचार करण्याच्या ऐवजी त्याचे बाह्य वर्तन पाहून त्याचा न्याय केला होता. हा अनुभव मला एक धडा शिकवून गेला ज्याद्वारे अशी चूक माझ्याकडून कधी होणे नाही.