शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By
Last Updated : मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (14:22 IST)

शिक्षक - समाजाचा आदर्श शिल्पकार

सप्टेंबर महिना व शिक्षक दिन यांचे अतूट नाते आहे. विद्यार्थी, पालक, समाज या दिवशी शिक्षकांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करतात. आजच्या विद्यार्थ्यांना उद्याच्या जीवनाला सामोरे जाण्यासाठी शिक्षक तयार करतात. क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उपजत असतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास होतो.
 
'गुरु-शिष्यांच्या' पवित्र बंधनाला आणखी दृढ करणारा 'शिक्षक दिन' हा दिवस! भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्यांची परंपरा पुरातन काळापासून चालत आली आहे. 'व्यास पौर्णिमेला' आपण आपल्या आध्यात्मिक गुरुंना वंदन करतो. 'जागतिक' शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. जगभर शिक्षक दिन वेगवेगळ देशात वेगवेगळ तारखांना पाळले जातात.
 
जसे, अफगाणिस्तानात 24 मे, अर्जेंटिना 11 सप्टेंबर, भूतान 2 मे, ब्राझील 15 ऑक्टोबर, चीन 10 सप्टेंबर आणि भारतात 5 सप्टेंबर! भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मे, 1962 ला राष्ट्रपतिपदाची सूत्रे हाती घेतली. तत्पूर्वी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. ते एक 'उत्कृष्ट शिक्षक' होते. आपल्या अंगभूत गुणांमुळे व व्यासंगी वृत्तीमुळे भारतभर व भारताबाहेर आदर्शाबाबत विख्यात असणार्‍या भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन (5 सप्टेंबर) सर्वत्र 'शिक्षक-दिन' म्हणून साजरा होतो. शिक्षकांनी किती व्यासंगी असावे याचा आदर्श 'वस्तुपाठ' त्यांनी आपल्या समोर  ठेवला. तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात वाढला. परंतु तंत्रज्ञान शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही. त्या   शिक्षकांचे स्थान काल, आज, उद्या समाजात व देशात अढळ राहील.
 
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात. 'The importnace of education is not only in knowlege and skill but it is to help us to live with other's आज माणूस एकेकापासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते. त्यांनी, शिक्षकत्वाच्या आदर्शाचा राजपथ तयार केला आहे. प्रत्येक शिक्षकान खर्‍या अर्थाने सुशिक्षित, सुसंस्कृत, विज्ञाननिष्ठ आणि उद्यमशील भारत घडविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे. 
 
'शिक्षक-दिन' दिवस साजरा करायचा म्हणजे बाकीच्या दिवसाला शिक्षकासह समाजातल्या सर्व घटकांनी त्यांना व त्यांच्या कार्याला 'विस्मृत' करायचे नाही. त्यांच्या गुणांचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे. सर्व शिक्षक-प्राध्यापकांचे आदर्श, भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, मानवतावादी विचारवंत, सिद्धहस्त लेखक, श्रोतंना मंत्रमुग्ध करणारे कुशल वक्ते, राजकारण, समाजकारण व धर्मकारण यांचे समन्वयक, भारताची प्रतिमा विदेशात उंचावणारे थोर तत्त्वचिंतक अशा विविधांगी व्यक्मित्वाचे धनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आम्हा शिक्षकांसमोर उत्तुंग प्रेरणादायी आदर्श व्यक्मित्व आहे.
 
वर्तमान काळात 'शिक्षक' हे केवळ अध्यापनकर्ता न राहता ते 'मार्गदर्शक', समुपदेशक देखील आहेत. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जितके विनयशील, संपन्न, व्यासंगी तितका परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर व विद्यार्थ्यांना मिळणार्‍या प्रेरणेवर होत असतो म्हणून तत्त्वज्ञान कितीही बदलले अध्ययन, अध्यापनाच्या प्रक्रियेत बदल झाला तरी संस्कारक्षम शिक्षकांचे महत्त्व कमी होणार नाही. 
 
'गुरुचा असावा ध्यास। प्रश्नांची व्हावी रास।
 
मग यश मिळेल हमखास॥' असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 'शिक्षक' हा कामगार नाही. तो 'शिल्पकार' आहे, कलावंत आहे. पालकत्वाची जबाबदारी तो पेलत असतो. आपला 'पाल्य' यशस्वी झाल्यावर शिक्षकांना त्याचे श्रेय देण्यास तो तयार आहे. आधुनिक युगाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ज्ञान-निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वाभिमान, सहकार्य, समाजाभिमुखता, साहस या गुणांनी युक्त  व्यक्तिमत्तवाची नितांत आवश्यकता देशाला व समाजाला आहे.
 
अशी व्यक्तिमत्वे घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी शिकत असतो. 'जो-जो ज्याचा घेतला गुण। तो तो गुरु म्या केला जाण।' हे ओळखून प्रत्येक गुरुंविषयी  /शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे.
 
विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ 'अर्थार्जनाचे' साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारे असता कामा नये. 'शिक्षक' असण्याची पहिली अट 'विद्यार्थी' असणे हीच आहे. 'शिक्षक' केवळ 'पोपटपंची' करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार संभवणार नाही. शिक्षक-विद्यार्थी परस्परपूरक असावेत. 'चांगला' शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. माहिती तंत्रज्ञानाचा 'विस्फोट' झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती 'दिशा' त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. 'माहिती-व्यवस्थापन' करत 'कुतूहल' व 'जिज्ञासा' जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत द्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी  दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे. 
 
शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण, जीवघेणी स्पर्धा, अध्यपन-अनुसंधानाविषयी सरकार व शिक्षकांची उदासीनता अशा अत्यंत विचित्र परिस्थितीत डॉ. राधाकृष्णन यांचा 'जन्मदिन' साजरा करताना तो केवळ शिक्षकांचे स्तुतिपर कार्यक्रम, परंपरा, रिवाज म्हणून न करता शिक्षक, समाज, राज्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी, जबाबदार पालकांनी अंतर्मुख होऊन नवीपिढी, नवा देश घडविताना आपण आपल्या कर्तव्याचे पालन कितपत प्रामाणिकपणे करत आहोत, हे स्वतःला विचारले पाहिजे. शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला रोजगार मिळावा, मूलभूत नागरी व वैयक्तिक मूल्ये विकसित व्हावीत. म्हणून आजच्या 'शिक्षक-दिनी' आपणाला संस्कारमय बनविलेल्या सेवेतील व्रतस्थ महान शिक्षकांना विनयांजली अर्पण करून, त्यांच्याप्रमाणे आपणही आयुष्याचे सार्थक करू या, हीच आजच्या शिक्षक दिनी प्रार्थना!
 
प्रा. चेतन तुपकर