शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (15:55 IST)

वास्तुनुसार डायनिंग रूम कसा असावा

आधुनिक जीवनशैली व जीवन जगण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल झाल्याने डायनिंग रूमला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. डायनिंग रूमचे घरातील इतर दालनांप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. डायनिंग रूम स्वयंपाक घरातच ठेवावी की स्वयंपाक घराला लागून स्वतंत्रपणे थाटावी याचा निर्णय ज्याने-त्यानेच घ्यावा. 


डायनिंग रूममधील वातावरण प्रसन्न राहण्याकरिता अंतर्गत सजावट महत्वपूर्ण ठरते. डायनिंग रूममधील मिळती-जुळती रंगसंगती, भिंतीवरील चित्रे, फर्निचर व डिनर सेट्स याची चोखंदळ निवड इत्यादी बाबीकडे विशेष लक्ष द्यावे. डायनिंग टेबलवर डिनर किवा लंचच्या वेळी आपल्या आवडीनुसार कर्णमधुर संगीत लावल्यास प्रसन्नतेत भरच पडते. दिवसभर व्यवसाय, नोकरीत व्यस्त कुटुंबांना निवांतपणा मिळतो तो रात्रीच्या वेळी. डायनिंग टेबल डिनर सोबतच सर्वांशी मनमुराद संवाद साधण्यासाठी एकदम उपयुक्त ठिकाण. वास्तुशास्त्रानुसार डायनिंग रूमच्या भिंतीस हिरवा, पिवळा रंग दिल्यास शोभेत आणखी भर पडते. 
 
डायनिंग टेबल रूममधील पश्चिम दिशेस ठेवल्यास हितावह ठरते. डायनिंग रूमचे प्रवेशव्दार व मुख्यद्वार सरळ रेषेत नसावे याबाबतीत दक्ष असावे. डिझायनिंगचा जमाना असल्याने डायनिंग टेबलही डिझाइन करण्याकडे लोकांचा कल असतो. परंतु, वास्तूशास्त्र याबाबत प्रयोग न करण्याचा सल्ला देते. डायनिंग टेबल शक्यतो चौरस आकाराचा असावा. डायनिंग टेबल रूमच्या मध्यभागी ठेवावे. मध्यभागी ठेवल्यास सभोवतालची जागा मोकळी राहून निवांतपणे बसण्यास सहाय्यभूत होते. 
 
एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे डायनिंग टेबलच्या खुरच्या सम संख्येत असाव्यात. विषम संख्येत असल्यास त्या एकाकीपणाच्या निदर्शक ठरतात. डायनिंग टेबल घडी करून कधीही ठेवू नयेत. तसेच भिंतीला लागूनही न ठेवण्याबाबत दक्षता बाळगावी. डायनिंग टेबलवर मुक्त संवाद झाल्यास शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही उत्तम राहून आदर्श कुटुंब निर्माण होण्यास वेळ लागत नाही. व्यस्त दिनक्रमात डायनिंग टेबलच मुलांवर संस्काराच्या व्यासपीठाची भूमिका बजावत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.