testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

वास्तुशास्‍‍त्रानुसार दिवाणखाना!

वेबदुनिया|
दिवाणखान्यात एकंदरीत घराचे प्रतिबिंब उमटत असते. घरातील व्यक्ती, त्यांच्या आवडी निवडी यांची पुसटशी कल्पना त्यावरून येते. दिवाणखान्यात पसारा असल्यास घरातील व्यक्ती आळशी असल्याचा निष्कर्ष काढला जातो. त्याचवेळी तो नीटनेटका असेल, तर गृहिणीचे कौतुक केले जाते. त्यामुळे येणार्‍या पाहुण्यांवर प्रभाव पाडण्यासाठी दिवाणखाना महत्त्वाचा ठरतो.
वास्तुशास्‍‍त्रानुसार दिवाणखाना सहसा वायव्य़, किवा पश्चिम दिशेकडे असावा. यामुळे स्नेही, परिचित व पाहुणे मंडळी यांच्याशी संबंध चांगले राहण्यास मदत होते. दिवाणखान्याचे प्रवेशव्दार घराच्या मुख्य प्रवेशव्दारापेक्षा लहान असावे. उत्तर व पूर्वेकडचा भाग शक्यतो मोकळा ठेवावा.

दिवाणखान्याचा मधला भाग इतर भागाच्या तुलनेत मोकळा ठेवावा. पोट्रेट्स व पेंटिंग्ज दिवाणखान्याच्या ईशान्य दिशेच्या भिंतीवर लावावीत. दिवाणखान्यात चित्र लावताना शुभ, अशुभ यांचे भान राखणे आवश्यक ठरते. युद्धाचे दृश्य, घुबड, ससाणा, कावळा, रडणारी मुलगी यांची चित्रे अशुभ असल्याने दिवाणखान्यात लावणे टाळावे.

अणकुचीदार कोपरे असलेले बाक दिवाणखान्यात ठेवू नये. वाद व मतभेद यांना यामुळे चालना मिळू शकते. तिजोरी दिवाणखान्यात ठेवल्यास आर्थिक परिस्थितीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. खिडक्या व दारे विरूद्ध दिशेस असल्यास होकारात्मक व नकारात्मक चक्र पूर्ण होण्यास मदत होते.

फर्निचर दाराच्या बाजूला ठेवल्यास मतभेदांना चालना मिळण्याची शक्यता असते. सोनेरी रंग हा समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. घरात माशांचा छोटा तलाव (एक्वेरियम) ठेवायचे झाल्यास ईशान्येकडे ठेवावे. त्यात एखादा सोनेरी रंगाचा मासा ठेवावा.

घरात पाळीव प्राणी असतात. परंतु, श्वानासारख्या प्राण्यांना फर्निचरवर बसू देऊ नये. यामुळे दिवाणखान्यातील चुंबकीय प्रवाहात असमतोल तयार होऊ शकतो. आपला प्रशस्त व सुंदर दिवाणखाना सजवताना साध्या सूचना लक्षात घेतल्या तर दिवाणखान्याच्या लौकिकात भरच पडेल.


यावर अधिक वाचा :