बोगस लसीकरण प्रकरणी ४ जणांना अटक
मुंबईतल्या कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहनिर्माण सोसायटीमधील बोगस लसीकरण प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून अजून तीन ते चार जण फरार आहेत. या ग्रुपने मुंबईत नऊ ठिकाणी अशाप्रकारे कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबीरं आयोजित केल्याची धक्कादायक बाबही उघड झाली आहे.
हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमधील बोगस लसीकरण प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेने चौकशीचे आदेश दिले आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. अजून तीन ते चार जण फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
बोगस लसीकरण प्रकरणी आतापर्यंतच्या तपासात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. या ग्रुपने केवळ हिरानंदानी हेरिेटेज गृहनिर्माण सोसायटीतच नाहीतर मुंबईत नऊ ठिकाणी अशाप्रकारे शिबीरं आयोजित केली होती व प्रत्येक ठिकाणी किमान २०० जणांनी लस घेतल्याचे समोर आल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. लसीकरणासाठी महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासातून उघड झाले असून लसीकरण शिबीराच्या वेळी कुणीही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते, असेही स्पष्ट झाले आहे.