शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (08:36 IST)

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

१०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्यात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आलीय. अनिल देशमुखांची न्यायालयीन कोठडी आज संपली असता न्यायालयानं त्याला मुदतवाढ दिलीय. विशेष म्हणजे न्यायालयाने अनिल देशमुखांना कोणताही दिलासा दिलेला नाही. अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबरला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते.
अटकेनंतर अनिल देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवले होते. यापूर्वी ईडीने पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. ईडी आणि सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात सुरू असलेल्या चौकशीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. अनिल देशमुखांना अटक करण्यापूर्वी ईडीने त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआयनेही छापे टाकले होते.
विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगानेही अनिल देशमुखांना ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान अनिल देशमुख यांचे वकील युक्तिवादासाठी हजर न राहिल्याने हा दंड ठोठावण्यात आला होता.