नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी सुरु
राज्यात कोरनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
याशिवाय मिशन ब्रेक द चेन – 2 अधिक जागरुगतेने आणि प्रखरतेने राबविण्याची त्यांनी सूचना केली आहे. शहरात दररोज 4 हजाराहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे. त्यासाठी एपीएमसी मार्केट, एमआयडीसी क्षेत्र या कोव्हिड प्रसाराच्या दृष्टीने जोखमीच्या ठिकाणीदेखील कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
रेल्वे स्थानकावर महानगरपालिकेची आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. हे पथक सकाळी 8 ते 1 या वेळेत नागरिकांची कोरोना चाचणी करतील. एका आरोग्य तपासणी पथकामध्ये 6 जणांचा समावेश आहे. सोमवारी बेलापूर, नेरुळ, आणि वाशी या तीन रेल्वे स्थानकांवर तपासणी केंद्रे सुरु झाली आहेत. या पथकांव्दारे व्यक्तीची लक्षणे पाहून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आरटीपीसीआर चाचणीवर भर देण्यात येत आहे.