मयांक भागवत
मुंबईजवळील कल्याणमध्ये एका वयोवृद्ध आजोबांनी त्यांच्या वृद्ध पत्नीला अमानुषपणे लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पत्नीला मारहाण करणाऱ्या या आजोबांचं नाव गजानन चिकणकर आहे. त्यांचं वय 85 वर्षं असून, त्यांच्या पत्नी 80 वर्षांच्या आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला. पण, "मारहाण झालेल्या आजी आणि कुटुंबीयांनी तक्रार देण्यास नकार दिला," अशी माहिती पोलिसांनी दिलीये.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, "जगभरात दर तीन महिलांमागे एका महिलेला शारिरीक किंवा लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो. भारतातही महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे."
कौटुंबिक अत्याचार सहन करणाऱ्या महिला तक्रार देण्यास पुढे का येत नाहीत? सामान्य व्यक्ती अशी तक्रार करू शकतो का? याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
आजींना मारहाणीचं प्रकरण काय आहे?
दोन दिवसांपूर्वी आजोबांकडून आजींना करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. बीबीसी मराठीने याची सत्यता पडताळून पाहिली. हा व्हिडीओ कल्याणच्या मलंगगड परिसरातील द्वारली गावातील असल्याचं आढळून आलं.
या घटनेने सगळ्यांच्याच मनात हळहळ आणि चीड निर्माण झालीये. पत्नीला मारहाण करणारे गजनान चिकणकर हे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. बुवा किंवा हरी भक्त परायण म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र, स्वतःच्या पत्नीला मारत असल्याच्या त्यांच्या व्हीडिओमुळे अनेकांना धक्का बसलाय.
लोकमत वृत्तपत्राच्या ठाणे आवृत्तीत आलेल्या बातमीनुसार, चिकणकर यांना दोन पत्नी असून पहिल्या पत्नीचं वय झाल्याने तिला घरातलं काम जमत नाही. यामुळे चिकणकर त्यांना मारहाण करतात.
पोलिसांची भूमिका?
गजनान चिकणकर यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अजून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत आम्ही पोलिसांकडे विचारणा केली.
कल्याणच्या हिल लाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. के. खंदारे म्हणाले, "पोलीस चिकणकर यांच्या घरी गेले होते. त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कोणाची काहीही तक्रार नाही. ही घटना 31 मे ला घडली आहे."
"व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला. चिकणकर सध्या घरी नाहीत. त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलावून समज देणार आहोत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल," असं खंदारे पुढे म्हणाले.
चिकणकर वारीनिमित्त आळंदीला गेल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आलीये. मात्र, कुटुंबीयांची याप्रकरणी तक्रार नसल्याने पोलिसांनी सध्या तरी गुन्हा दाखल केलेला नाही.
महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे म्हणतात, "कौटुंबिक हिंसाचार आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षा कायद्यांतर्गत कोणीही जाऊन तक्रार दाखल करू शकतात. पोलिसांनी स्वत:हून तक्रार दाखल केली पाहिजे."
महिला तक्रार देत नाहीत याची कारणं काय?
घरगुती हिंसाचारानंतर गुन्हा दाखल न करणं हे राज्यात सर्रास पाहिलं जातं. यामुळेच राज्यासह देशात अनेक ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार होत असूनही तक्रारी पुढे येत नसल्याचं तज्ज्ञांना आढळलंय.
महिला घरगुती हिंसाचाराची तक्रार का देत नाहीत? याची कारणं जाणून घेण्यासाठी आम्ही मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले जेंडर रिसोर्स सेंटरच्या समन्वयक स्नेहा खांडेकर यांच्याशी संपर्क केला.
त्या म्हणतात, महिला कौटुंबिक अत्याचाराबाबत तक्रार देत नाहीत यामागे चार प्रमुख कारणं आहेत.
महिलांना घरातून पाठिंबा मिळत नाही. कुटुंबीयांचा पाठिंबा नाही मग बाहेरचे मदत का करतील? अशी भावना त्यांच्या मनात तयार होते
या महिलांना पोलिसांकडे मदत मागावी लागते. पोलिसांबद्दल असलेले गैरसमज खूप आहेत. त्यामुळे महिला पुढे येत नाहीत
पुरुषप्रधान संस्कृतीचा भारतीय समाजावर असलेला पगडा
हा आमचा घरातील, वैयक्तिक प्रश्न आहे असं म्हणणं हा कौटुंबिक अत्याचाराचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे
"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, मारहाण करणाऱ्या व्यक्तीला कोणीच थांबवलं नाही. आसपास उपस्थित लोक पुढे आले नाहीत. अशी महिला तक्रार करण्यासाठी पुढे येईल का?" असं स्नेहा खांडेकर म्हणाल्या.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कल्याणमध्ये घडलेला हिंसाचाराचा प्रसंग आणि यांसारखे असंख्य इतर प्रसंग पोलिसांच्या रेकॉर्डवर आणि पर्यायाने गुन्हे म्हणून पुढे येऊ शकलेले नाहीत.
स्नेहा खांडेकर पुढे सांगतात, "कौटुंबिक अत्याचाराच्या मुद्द्याचा समावेश सार्वजनिक आरोग्य या विषयात व्हावा याची मागणी गेली 20 वर्षांपासून केली जातेय."
घरगुती अत्याचाराविरोधात महिला का बोलत नाहीत?
कौटुंबिक अत्याचाराविरोधात महिलांनी आवाज न उठवण्याची इतरही प्रमुख कारणं आहेत -
घरात दुय्यम स्थान असल्याने कुटुंब प्रमुखाविरोधात बोलायची हिंमत नाही
नवऱ्याच्या गैरवर्तनाबाबत घराबाहेर चर्चा गेली, तर हिंसाचार अधिक वाढतो असा अनुभव
घरातल्यांनी बाहेर काढलं तर जाणार कुठे? नवऱ्याविरोधात बोलणं आपल्या संस्कृतीत नाही असं मनावर बिंबवलेलं असणं
आम्ही भांडतो तसंच प्रेम करतो अशी आर्ग्युमेंट
कौटुंबिंक अत्याचार कायद्याबाबत महिलांना नसलेली माहिती
वर्षा देशपांडे पुढे सांगतात, "महिलांनी तक्रार करण्यासाठी पुढे येणं ही सोपी गोष्ट नाही. त्यांना त्याच घरी, नवऱ्यासोबत रहावं लागतं. महिलांना आर्थिक सुरक्षा मिळाल्याशिवाय त्या पुढे येणं शक्य नाही."
भारतात घडणाऱ्या कौटुंबिक अत्याचाराच्या घटना
केंद्र सरकारच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार,
2019 मध्ये महिलांविरोधातील अत्याचाराच्या 4 लाखांपेक्षा जास्त घटना नोंदवण्यात आल्यात.
साल 2018 च्या तूलनेत यात 7.3 टक्क्यांनी वाढ
नवरा किंवा कुटुंबियांकडून मारहाण झाल्याच्या घटना 30.9 टक्के नोंदवण्यात आल्या होत्या
स्नेहा खांडेकर पुढे सांगतात, "वृद्ध महिलांवर झालेल्या अत्याचारांची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण, याकडे फार कमी प्रमाणात लक्ष दिलं जातं. वयोवृद्ध महिलांवर कुटुंबीयांकडून मानसिक आणि आर्थिक अत्याचार मोठ्या प्रमाणात करण्यात येतात."
भारतात, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत 2019 मध्ये 553 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात केरळमध्ये 194, मध्यप्रदेशात 248 तर महाराष्ट्रात 11 प्रकरणांची नोंद करण्यात आली होती.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या माहितीनुसार, 33 पुरुषांना कौटुंबिक अत्याचाराप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. तर 60 पुरुष आणि एका महिलेला दोषमुक्त करण्यात आलं.
सामान्य व्यक्ती गुन्हा दाखल करू शकतो?
कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 प्रमाणे, "कोणीही व्यक्ती घरगुती हिंसाचाराबद्दल पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊ शकतो, योग्य हेतूने माहिती देणाऱ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही आणि पोलीस आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी पीडितेला तिच्या हक्कांबद्दल माहिती द्यावी."
"कौटुबिंक अत्याचार किंवा काम करण्याच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्यास पिडीत महिलेला पुढे येऊन तक्रार करावी लागते. सामान्य लोक या महिलेला मदत करू शकतात," असं स्नेहा खांडेकर सांगतात.