शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 मे 2021 (08:00 IST)

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी

.कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. वकील दत्ता माने यांनी ही याचिका केली असून त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.
 
‘जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो आणि जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखे आहे’, असे दत्ता माने यांनी याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी अदर पूनावाला यांच्यासह सीरमच्या संपत्तीचेही रक्षण केले पाहिजे अशी मागणी याचिकेत केली आहे. तसेच दत्ता माने यांनी याचिकेत आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिली असून आपण पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे याप्रकरणी तक्रार केली असल्याचा दावा केला आहे.
 
दरम्यान, अदर पूनावाला यांनी युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे, धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचे नाव घेतले किंवा उत्तर दिले तर माझा शिरच्छेद केला जाईल’, अशी भीती व्यक्त केली आहे. याच्याच आधारे दत्ता माने यांनी न्यायालयात याचिका केली आहे.