गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (15:24 IST)

महापरिनिर्वाण दिन नियमावली जाहीर, चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम घेण्यास मनाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर कोणताही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
 
कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये 'ओमायक्रॉन' या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सभा, संमेलने, मोर्चा काढण्यासदेखील राज्य शासनाने मनाई केली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. असे आवाहनही करण्यात आले आहे. महापरिनिर्माण दिन अनुयायांनी अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
राज्य सरकारकडून जाहीर नियमावली
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2021 रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे.
 
कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेन अंतर्गद दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
 
महापरिनिर्वाण दिन हा भारतीयांसाठी दु:खाचा, गांभीर्याने पालन करावयाचा असून परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेल्या धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे.
 
यासोबतच शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे न येता घरी राहूनच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.
 
राज्य शासनाने जारी केलेल्या सूचनांमध्ये महत्त्वाचे म्हणजे चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर अशा मान्यवरांना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. 
 
कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
 
दादर येथील चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात कोणतेही स्टॉल लावण्यात येणार नाहीत, असे जाहीर केले आहे. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने आणि मोर्चे काढू नयेत,  असेही आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.