मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 जानेवारी 2021 (16:00 IST)

मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार

Mumbai Central Station
मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
“गेली सहा वर्ष मी आणि माझे शिवसेनेचे सहकारी लोकसभेत पाठपुरावा करत होतो. अमित शाह यांना अलीकडेच यासंबंधी पत्र पाठवलं होतं. महाविकास आघाडीने विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर केला. मंजूर केल्यानंतर तुमच्याकडून फक्त प्राथमिक मान्यता मिळणं गरजेचं आहे, ती अजून मिळालेली नाही त्यामुळे आपण तातडीने लक्ष घालावं. याचं उत्तर त्यांच्या राज्यमंत्र्यांनी मला पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी प्रक्रिया सुरु असून अल्पवधीत मान्यता देऊ असं सांगितलं आहे,” अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे.
 
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय याआधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात नाना शंकरशेठ यांचं मोठे योगदान होतं. त्यामुळे नाना शंकरशेठ यांचं नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्याची मागणी होत होती.