1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 सप्टेंबर 2020 (09:08 IST)

आग्र्यातील मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून ओळखलं जाणार

Agra's Mughal Museum to be renamed as Chhatrapati Shivaji Maharaj
आग्रा- आग्र्याच्या मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केलं जाणार आहे. आग्र्यातील विकास कामांचा आढावा घेताना स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली. या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली.
 
आग्र्यात सध्या मुघल म्युझियमचं बांधकाम होत आहे. परंतु योगी सरकारने आता या म्युझियमचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
उत्तर प्रदेशात नामांतराचं राजकारण पुन्हा सुरु झालं आहे. पूर्वी अलाहाबादचं नामांतर प्रयागराज, फैजाबादचं अयोध्या, तर मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता योगी सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचं नाव बदललं आहे. 
 
योगी यांनी ट्विट करत ‍लिहिले की "आग्रामध्ये निर्माण होत असलेल्या म्यूझियमला आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतिकांचं कोणतंही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत."
 
ताजमहलच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर बनत असलेल्या मुघल म्युझियमला अखिलेश सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे.