1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मार्च 2020 (10:06 IST)

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित करुन मिळणार आहेत. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे उद्घाटन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
 
या डिजिटल सेवेचे उद्घाटन करताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई विद्यापीठाने कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ऑनलाईन साक्षांकनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विद्यार्थी केंद्रीत महत्त्वपूर्ण  निर्णय घेतला असून ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कालपरत्वे बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यापीठाने कालसुसंगत अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ असून या विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असून विद्यापीठातील नवीन उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. संगणकीय साक्षांकन प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन ते चार दिवसांत कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करुन दिली जाणार असून पुढील प्रक्रियासुद्धा विद्यापीठामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सत्यता तपासणी आणि चौकशी यापासून सुटका मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करुन परदेशात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे असेही श्री. सामंत यांनी यावेळी संगितले.
 
मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत केली जाणार आहे. यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन दिली जाणार असून विद्यार्थ्यांना या सुविधेचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे. आजमितीस वर्षाला सुमारे दहा हजार विद्यार्थी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे साक्षांकित करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज करीत असल्याचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी सांगितले.
 
कुलगुरू सुहास पेडणेकर म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्ताने लागणारी शैक्षणिक कागदपत्रे ऑनलाईन साक्षांकित करुन देण्याच्या या प्रक्रियेला सुरुवात होत असून विद्यापीठाने टाकलेले हे एक डिजिटल पाऊल आहे. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेमुळे वेळेची बचत तर होईलच, त्याचबरोबर कमीत कमी खर्चात विद्यार्थ्यांना घरबसल्या ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
 
ऑनलाईन ट्रान्सस्क्रीप्ट आणि साक्षांकन प्रणालीची वैशिष्ट्ये -
१.    कोठूनही, कधीही आणि केव्हाही अर्ज करणे शक्य.
२.    प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्ज करण्याची आवश्यकता नाही यामुळे वेळेची आणि कष्टाची बचत
३.    विदेशी शिक्षण संस्थांना कुरियरद्वारे माहिती पाठविण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण खर्चाची बचत.
४.    आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रक्रियांचे पालन करून ऑनलाईन अर्जामध्ये सुलभता आणली गेली आहे.
५.    कागदपत्रे गहाळ होण्याची भीती नाही.
६.    थेट परदेशी संस्थांकडे हस्तांतरण.
७.    अर्जाची स्थिती तात्काळ पाहता येईल.
८.    ही प्रणाली पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
९.    यामुळे कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहू शकतील.