1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (21:32 IST)

पावसाळ्यापूर्वीची कामे : २४ हजार झाडांची छाटणी पूर्ण

mumbai mahapalika
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या खात्यांमार्फत पावसाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी ही सर्व पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधित खात्यांना दिले आहेत. याच अनुषंगाने उद्यान खात्याकडून करण्यात येणारी कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. त्यानुसार उपआयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या देखरेखीखाली उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे.
 
वर्ष २०१७ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करुन छाटणीची कामे निश्चित करण्यात येतात. जी झाडे लहान असतात, ज्यांच्यापासून कोणताच धोका नसतो, अशांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही.
 
या प्रक्रियेनुसार, उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख १५ हजार ११४ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्‍त्‍यांच्‍या कडेला असलेल्या सुमारे ८५ हजार ५०५ झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे निश्चित करण्यात आले. सर्व २४ विभागांमध्ये या कामी यंत्रसामुग्री, मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. त्याचप्रमाणे, खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
 
उद्यान विभागाकडून करण्यात येणाऱया पावसाळापूर्व कामांमध्‍ये प्रामुख्याने मृत असलेल्या झाडांचे निर्मूलन, धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांचे निर्मूलन, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरण, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे / खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे.
 
हाऊसिंग सोसायटी, शासकीय – निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणा-या वृक्षांच्‍या छाटणीकामी, संतुलित करणेकामी महानगरपालिकेने ४ हजार ६२२ नोटीस दिल्‍या आहेत. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अतिशय वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor