1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (08:21 IST)

मोठी बातमी, मुंबईच्या मध्यभागी ६०० एकर जागा वनासाठी राखीव

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची ६०० एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशाप्रकारे विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. 
 
राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसंच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राखीव वन क्षेत्राबाबत कलम ४ लावण्यात येऊन त्यानुसार ४५ दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.
 
वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.