मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (08:31 IST)

तृतीयपंथी मतदार नोंदणीसाठी १० एप्रिलपर्यंत विशेष शिबिर

Special camp for third party voter registration till April 10
३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. त्या निमित्ताने दि. २७ मार्च ते १० एप्रिल २०२२ दरम्यान ‘तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त तृतीयपंथी लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
 
याकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघाच्या मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रात तृतीयपंथी मतदारांचा शोध घेऊन त्या कार्यक्षेत्रात शिबीर आयोजित करण्यात आले.
 
तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीच्या विशेष कार्यक्रमासाठी १७९ सायन कोळीवाडा विधानसभा मतदार संघातर्फे सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास मुंबई, कौशल्य विभाग यांच्या सहकार्याने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई येथे दि. ३० मार्च २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी मतदार नोंदणीच्या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास तृतीयपंथी मतदारांनी विशेष प्रतिसाद दिला आहे. यात सामाजिक न्याय विभागातर्फे तृतीयपंथी मतदारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
 
मुंबई शहर जिल्ह्यात विविध विधानसभा मतदारसंघातील तृतीयपंथी मतदारांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्याकडून नवीन नाव नोंदणीचे अर्ज व नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज स्विकारण्यात आले. १८१ माहिम विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त घरोघरी जाऊन निवडणूक मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले व नवीन नाव नोंदणीचे अर्ज स्वीकारण्यात आले.
 
या विशेष सप्ताहाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त तृतीयपंथी नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निवतकर यांनी केले आहे.