शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 जून 2021 (14:24 IST)

परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का बसला आहे. महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही हे धक्कादायक आहे, असे मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली आहे.
 
परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान 30 वर्षे या खात्यात असूनही त्यांच्यावर तुम्हाला विश्वास नाही का असा सवाल करत परमबीर सिंह यांना फटकारले आहे. आपण काचेच्या घरात राहात असू तर इतरांच्या घरांवर दगड फेकू नयेत, असे न्यायालयाने या सुनावणीत म्हटले. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
 
माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी चौकशी हा सुडाचा भाग असल्याचे म्हणत यासाठी महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र ती आज फेटाळ्यात आली.
 
परमबीर सिंह यांना न्यायालयाने दणका दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.  
 
परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूनं वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीनं युक्तिवाद केला आहे.