निर्णय झाला, मात्र सर्व महिलांना प्रवास परवानगी देण्याबाबत संभ्रम
राज्य सरकारने महिला प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा आज, शनिवारपासून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी मध्य रेल्वे प्रशासनाने मात्र सरसकट सर्व महिलांना प्रवास परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व महिलांना प्रवास परवानगी देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्य़ांतील महिलांना आज, शनिवारपासून उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. ‘क्यू आर कोड’च्या ओळखपत्राशिवाय केवळ तिकिटावर महिलांना प्रवास करता येईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र आज, १७ ऑक्टोबरपासून सर्वच महिला प्रवाशांना लोकल प्रवास करता येणार नाही. राज्य सरकारने तशी परवानगी दिली असली तरी यासंदर्भात मध्य आणि पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात लोकल फेऱ्यांचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ वाजल्यापासून रात्री उपनगरीय रेल्वे बंद होईपर्यंत प्रवास करता येईल. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची विनंतीही राज्य सरकारने रेल्वेला केली आहे. परंतु, खासगी क्षेत्रातील महिलांसह सरसकट सर्व महिलांना प्रवासाची परवानगी देताना त्यांची संख्या किती? त्यासाठी किती रेल्वे फेऱ्यांची गरज आहे, याची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.