शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (17:06 IST)

'त्याच्या हातात राॅड होता म्हणून पुढे जायला भीती वाटली', वसईत हत्या होताना लोक व्हीडिओ बनवत होते- ग्राऊंड रिपोर्ट

- दीपाली जगताप
"त्याला फाशीची शिक्षा द्या. आमची मुलगी गेली, त्यामुळे त्यालाही अशीच शिक्षा व्हायला हवी. आम्ही काही दिवसांपूर्वी पोलीस तक्रार केली होती. तेव्हाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असतं तर आज माझ्या मुलीचा जीव वाचला असता," हंबरडा फोडत आरती यादवची आई सांगत होती.
 
निर्जला यादव यांच्या तीन मुलींपैकी मोठी मुलगी आरती यादवची मुंबईलगतच्या वसईमध्ये दिवसाढवळ्या भर रस्त्यात हत्या करण्यात आली.
 
22 वर्षीय आरतीचं शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झालेलं. कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी तिला पैसे जमवायचे होते, यासाठी ती एका खासगी कंपनीत काम करत होती.
 
18 जून रोजी कामावर जात असताना सकाळी साधारण साडे आठ वाजता लोखंडी पान्ह्याने आरोपीने तिच्यावर 14 ते 16 वेळा वार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. 29 वर्षीय आरोपी रोहित यादव याला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
 
रोहित आणि आरती एकमेकांना ओळखत असून जवळपास सहा वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
आरतीच्या डोक्यावर लोखंडी पान्ह्याने वार केल्यानंतर, तिचा मृत्यू झाल्यावरही दिनेश बराच वेळ तिच्या समोर उभा राहिला.
 
ही घटना घडत असताना मोठ्या संख्येने लोक पाहत होते. एका तरुण मुलाने दिनेशला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने त्यालाही बाजूला ढकललं. परंतु एक जण वगळता एवढ्या गर्दीतून कोणीही आरतीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं नाही.
 
याउलट अनेकजण हा थरकाप उडवणारा प्रसंग मोबाईलच्या कॅमे-यात रेकाॅर्ड करण्यात दंग होते.
 
'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? आरतीने दिनेशविरोधात तक्रार का केली होती? आणि पोलिसांना तपासात काय आढळलं जाणून घेऊया.
 
लोक नुसतेच बघत राहिले?
वसईतील गावराई पाडा हा परिसर संपूर्ण इंडस्ट्रिअल आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे या भागात आहेत. यासाठीचे दुकानांचे गाळे सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. यामुळे सकाळी कामावर जाणारे कर्मचारी, कामगार यांची या परिसरात वर्दळ असते.
 
याच परिसरात आरती सकाळी आठ-साडे आठ वाजताच्या सुमारास कामाच्या ठिकाणी जात असताना पांढ-या शर्टमध्ये एक इसम अचानक आला आणि तिच्यावर लोखंडी पान्ह्याने वार करू लागला.
 
तो केवळ एक-दोन वेळा मारून थांबला नाही. तर त्याने तब्बल 14-16 वेळा तिच्यावर वार केले.
 
कार्यालयीन वेळ असल्याने याच मार्गावरून जाणाऱ्या लोकांची गर्दी तिथे जमली. अनेक जण या हत्येचे प्रत्यक्षदर्शी बनले. परंतु आरतीला वाचवण्यात किंवा दिनेशला किमान मारण्यापासून थांबवण्यासाठी एक अपवाद वगळता कोणीही पुढे सरसावलं नाही असं प्रत्यक्षदर्शी सांगतात.
 
एका तरूणाने दिनेशला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला एकट्याला थांबवता आले नाही. बाकीचे लोक मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचं दिसलं. अनेकांनी आपल्या खिशातून, बॅगेतून मोबाईल फोन काढले आणि हत्येचं रेकाॅर्डिंग सुद्धा सुरू केलं.
 
ही घटना ज्या एका छोट्या कारखान्याच्या दुकानासमान गाळ्यासमोर घडली तिथे काम करणार्‍या एका प्रत्यक्षदर्शीला आम्ही भेटलो.
 
18-19 वर्षीय रितीक यादव यांनी दिनेशला मुलीवर वार करताना पाहिलं असं ते सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना रितीकने सांगितलं, "राॅडसारखं काहीतरी त्याच्या हातात होतं. मी त्याला मारताना पाहिलं. तिचा मृत्यू झाला होता तरीही तो तिच्यावर वार करत राहिला. त्याच्या हातात राॅड होता म्हणून पुढे जायला भीती वाटली. बाकी लोकही कोणी पुढे सरकत नव्हतं म्हणून मी विचार केला की मी एकटा जाऊन काय करणार."
 
या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं. ज्यात हा संपूर्ण प्रसंग स्पष्ट होतो. याच व्हिडीओमध्ये लोक हा प्रसंग पाहत आहेत पण मदतीसाठी काहीच करताना दिसत नाहीयेत हे समोर आलं.
 
तीन ते चार लोकांनी जरी एकत्रपणे आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तरी आमच्या मुलीचा जीव वाचला असतं असं आरतीच्या कुटुंबियांना वाटतं.
 
आरतीचे काका दिनेश यादव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "एका मुलाने मदत केली पण त्यालाही त्याने मारलं. तो मागे झाला. बाकी सगळे पाहत उभे राहिले. मदत केली असती तर माझी मुलगी वाचली असती. आम्ही पोहचलो तेव्हा आरोपी मुलगा तिथे उभा होता. त्याला पोलीस आमच्यासोबतच घेवून गेले."
 
या हत्येप्रकरणी वाळीव पोलीस स्टेशनमध्ये रोहित यादव विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला गेला आहे. तर कोर्टाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
वाळीव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं,"कदाचित मुलगी वाचली असती. मी लोकांना आवाहन करतो की, घटना अशी घडत असेल तर लगेच पुढे जायला पाहिजे. दुर्देवाने तसा प्रकार झाला नाही. नाहीतर मुलगी वाचली असती."
 
'पोलिसांनी तेव्हाच त्याला पकडलं असतं तर...'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती आणि रोहित काही वर्षांपूर्वी शेजारी रहायचे. त्यांच्यात जवळपास सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतु गेल्या काही काळापासून वाद सुरू झाले होते.
 
आरतीने 8 जून रोजी आचोळे पोलीस स्टेशनमध्ये दिनेशची तक्रार नोंदवली होती.
 
रात्री पावणे बारा वाजता आरती तिच्या बहिणीसह पोलीस स्टेशनला पोहचली. एका ओळखीच्या इसमाने आपला मोबाईल फोन फोडला असून मारहाण केल्याचं आरतीने पोलिसांना सांगितलं. तसंच मोबाईलची भरपाई द्यावी असंही ती म्हणाली. परंतु यावेळी आपले या इसमासोबत प्रेम संबंध आहेत ही माहिती तिने लपवली, असं पोलीस सांगतात.
 
दुस-या दिवशी सकाळी आचोळे पोलिसांनी रोहितला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं. त्याला समज दिली. पोलिसांनी नोटीस बजावली. परंतु याच वेळी पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतलं असतं तर आरती वाचली असती असं यादव कुटुंबियांचं म्हणणं आहे.
 
यासंदर्भात बोलताना आचोळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सांगतात, "या आरोपात तथ्य नाही. 8 तारखेला आरतीने सांगितलेली तक्रार नोंदवली आहे. रविवारी 9 तारखेला रोहित यादव आणि आरती यांना बोलवलं होतं. तिच्यासमोर त्याला समज दिली होती. तसंच यापुढे काही करशील तर दखलपात्र गुन्हा दाखल करू अशी नोटीस दिली."
 
"पोलिसांनी तिच्यासमोर त्याला दम दिला तेव्हा ती म्हणाली की इसको कुछ मत बोलो. आमचं प्रेम प्रकरण आहे. तरीही आम्ही कायद्यात बसतं त्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई केली होती,"
 
दरम्यान, वाळीव पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडल्याने आता या हत्येचा तपास त्यांच्याकडे आहे.
 
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवरे सांगतात,"काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतु एक महिन्यापासून वाद विवाद सुरू झाले. मुलाला संशय होता की मुलीचं दुसरीकडे कुठेतरी प्रेम प्रकरण चालू असावं. त्या रागाच्या भरात मुलाने मुलीला पान्हा असतो त्याने डोक्यात वार करून तिची हत्या केली."
 
'आम्ही लग्नासाठी नकार दिला होता'
वसईतील शिर्डी नगर येथील साईधाम चाळीमध्ये यादव कुटुंबियांचं घर आहे. आरतीचे वडील रामदुलार यादव हे पाणीपुरीची गाडी चालवायते. ते मुळचे उत्तर प्रदेश राज्याचे. साधारण पंधरा वर्षांपूर्वी काम शोधण्यासाठी मुंबईत आल्याचं ते सांगतात.
 
आरतीला दोन लहान बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. सर्वांचं शालेय शिक्षण सुरू आहे.
 
आम्ही त्यांच्या घरी पोहचलो त्यावेळी आरतीची आई निर्जला यादव आणि वडील रामदुलार यादव घराच्या उंबरठ्यावरच बसले होते. सोबत काही गावाहून आलेले नातेवाईक त्यांच्यासोबत बसले होते.
 
आम्ही निर्जला यादव यांची बोलण्यासाठी परवानगी घेतली. त्या म्हणाल्या, "पोलिसांनी त्याला आधीच पकडलं असतं तर आमची मुलगी वाचली असती."
 
एवढं बोलून त्या रडू लागल्या.
 
पुढे त्या म्हणाल्या की, " त्या मुलाची आमच्या मुलीशी लग्न करायची इच्छा होती. त्याने आधी आरतीला विचारलं. तिने घरी सांगितल्यावर मी म्हटलं की त्याला आमच्याशी बोलायला सांग. आम्ही लग्नाला नकार दिला. मुलाकडे घर नाही. त्याला आई-वडील नाहीत. अशी मुलगी कशी देणार आम्ही आणि आरतीनेही नकार कळवला होता. यासाठीच त्याने तिचा जीव घेतला."
 
याविषयी बोलताना आरतीच्या वडिलांनी सुद्धा हीच माहिती दिली.
 
रामदुलार यादव म्हणाले,"लग्नाची चर्चा झाली होती. पण त्याच्याजवळ ना घर ना काही. त्याच्यासोबत लग्न कसं करून देणार."
 
वाळीव पोलिसांनी रोहित आणि आरती या दोघांचेही मोबाईल फोन जप्त केले असून फाॅरेन्सिक तपासासाठी दिले आहेत. तसंच कोर्टाने रोहित यादवला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.