बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (09:03 IST)

कथक सम्राट बिरजू महाराज यांचं निधन

प्रसिद्ध कत्थक नर्तक बिरजू महाराज यांचं रविवारी (16 जानेवारी) रात्री उशीरा निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त बिरजू महाराज यांच्या निधनाचं वृत्त त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी फेसबुक पोस्ट लिहून दिलं आहे. बिरजू महाराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
बिरजू महाराज यांचा जन्म लखनऊमधल्या प्रसिद्ध घराण्यात झाला होता. त्यांचे वडील अच्छन महाराज आणि काका शंभू महाराज देशातल्या प्रसिद्ध कथक कलाकारांपैकी एक होते. बिरजू महाराज यांचं खरं नाव बृजमोहन मिश्रा होतं. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या नवव्या वर्षीच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या काकांकडून कथक शिकायला सुरुवात केली.
 
काळी काळानंतर कपिला वात्स्यायन त्यांना दिल्लीला घेऊन गेल्या. तिथं त्यांनी संगीत भारती संस्थेत लहान मुलांना कथक शिकवायला सुरुवात केली. दिल्लीत काहीकाळ त्यांनी कथक केंद्राचा कार्यभार सुद्धा सांभाळला. त्यांनी कथकचे अनेक प्रयोग केले. काही सिनेमांसाठी त्यांनी कोरिओग्राफीसुद्धा केली.
 
बिरजू महाराज यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कला क्षेत्रातल्या अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.
 
गायक अदनान सामीनेही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अदनान सामीने सोशल मीडियावर लिहिले - महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज जी यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे.