सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (15:58 IST)

देशभरात 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरु होणार; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

केंद्र सरकारनं (central government) देशभरात चित्रपटगृहं (cinema)सुरू करण्याची परवानगी दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहं सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं नियमावली जाहीर केली आहे.
 
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. “गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार १५ ऑक्टोबरपासून देशात चित्रपटगृहं (cinema), मल्टीप्लेक्स (mulltiplex) सुरू होणार आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातील नियमावली जाहीर केली आहे आणि ५० टक्के क्षमतेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे,” असं जावडेकर म्हणाले.
 
“चित्रपटापूर्वी करोना संदर्भात जनजागृती करणारी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म अथवा एक घोषणा करणं अनिवार्य आहे. तसंच ऑनलाइन तिकिट आरक्षित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे,” अशी माहितीही जावडेकर यांनी दिली. 
 
केंद्रीय गृह मंत्रालयाने १५ ऑक्टोबरपासून देशभरात ५० टक्के क्षमतेत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिल्यानं गेले सहा महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना आशेचा किरण दिसू लागला आहे, निर्णय देशातील त्या त्या राज्यांवर अवलंबून आहे. जर राज्यांनी चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय घेतल्यास आणि ती सुरू झाल्यास तरच दसरा-दिवाळीत उत्पन्न घेता येईल, असं चित्रपटगृह मालकांकडून सांगितलं जात आहे.
 
काय आहेत नियम ?
चित्रपटगृहातील प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणं बंधनकारक आहे.
चित्रपट सुरू होण्यापूर्वी एका मिनिटांची शॉर्ट फिल्म जनजागृतीसाठी दाखवणं बंधनकारक असेल
सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं.
ज्या जागी प्रेक्षकांना बसता येणार नाही त्या आसनांवर खुणा केलेल्या असाव्यात.
प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्याचा सल्ला द्यावा.
मध्यांतरामध्ये प्रेक्षकांना इतरत्र जाणं टाळावं.
सातत्यानं साफसफाई आणि सॅनिटायझेशन केलं जावं.
आवश्यकता भासल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रेक्षकांचे फोन क्रमांक घ्यावे.
प्रेक्षकांना आवश्यकता असल्यास पॅकेज फूडच देण्यात यावं.
एक सीट सोडून दुसऱ्या व्यक्तीला चित्रपटगृहात बसावं लागणार आहे.