बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (12:37 IST)

दिल्ली: थकबाकी भरल्याशिवाय सिगारेट न दिल्याबद्दल तरुणाने चिडून,चाकूने गळा चिरून महिला दुकानदाराचा खून केला

दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या डाबरी भागात एका महिला दुकानदाराची दारूच्या नशेत एका व्यक्तीने हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी दिलीप (45) याला अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी घडली,थकबाकी न भरल्याने महिलेने आरोपीला सिगारेट देण्यास नकार दिल्याने चिडून तरुणाने  महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले.
 
पोलिसांनी सांगितले की ,गंभीररित्या जखमी झालेल्या 30 वर्षीय महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .या महिलेचे नाव विभा असून ती आपल्या पतीसह परिसरात किराणा दुकान चालवायची. हल्ल्यानंतर, महिलेला तिच्या पतीने रुग्णालयात नेले जेथे तिला मृत घोषित करण्यात आले, 
 
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आरोपी दिलीप (45) हा हातात टूलकिट घेऊन पीडितेशी बोलताना दिसत आहे. त्यानंतर दिलीपने टूलकिटमधून धारदार शस्त्र काढून महिलेचा गळा चिरला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की आरोपी शस्त्र त्याच्या टूलकिटमध्ये परत ठेवतो आणि तेथून निघून जातो.
 
डीसीपी म्हणाले की, रविवारी रात्री 10.20 च्या सुमारास डबरीच्या सोम बाजार रस्त्यावर एका महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची माहिती मिळाली. घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान, एक पीसीआर व्हॅन घटनास्थळी पोहोचली आणि दिलीपला नशेच्या अवस्थेत पकडले.
 
संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि आरोपींला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, दिलीपला जमावापासून वाचवण्यात आले आणि त्याला पोलीस ठाण्यात नेऊन अटक करण्यात आली. हत्येत वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
पोलिसांनी सांगितले की, चौकशी दरम्यान, दिलीप, जो प्लंबरचे काम करतो, त्याने सांगितले की तो विभा कडून सिगारेट आणि किराणा माल खरेदी करायचा आणि मागील खरेदीचे काही पैसे बाकी होते. रविवारी संध्याकाळी महिलेने दिलीपला थकबाकी भरण्यास सांगितले, यामुळे दोघात वाद झाले. पोलिसांनी सांगितले की, वादादरम्यान त्याने विभाचा गळा चिरला.
 
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांखाली वेगळा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.