मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (16:22 IST)

तामिळनाडूत विमानामध्ये लावलं लग्न, DGCA ने दिले चौकशीचे आदेश

तामिळनाडूत एका जोडप्यानं विमानप्रवासातच लगीनगाठ बांधली. 'हवेतल्या' या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर एकीकडे हा चर्चेचा विषय ठरला, तर दुसरीकडे वादाचाही. कारण या लग्नामुळे विमान कंपनी स्पाईस जेट अडचणीत आलीय.
 
डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन अर्थात DGCA ने विमानातील लग्नाच्या या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर विमान कंपनीनं लग्नावेळी विमानात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
 
नेमकं काय घडलं?
मदुराई (तामिळनाडू) हून उड्डाम केलेल्या स्पाईस जेटच्य विमानात एका जोडप्यानं लग्न केलं. वधू-वराकडील नातेवाईक आणि पाहुणेमंडळीही याच विमानात होती.
मदुराईतल्या एका व्यक्तीनं हवाई प्रवासात लग्नासाठी रविवारी (23 मे) स्पाईस जेटचं चार्टर फ्लाईट बुक केलं. पण विमान कंपनी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, विमानात लग्नसमारंभ केला जाईल, याची माहिती देण्यात आली नव्हती.
मदुराई विमानतळाचे संचालक एस. सेंथील वलावन यांनी एएनआय वृत्तसेवा संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "स्पाईसजेटचं चार्टर्ड फ्लाईट काल बुक केलं होतं हे खरंय. पण हवाई प्रवसात लग्नासाठी ते बुक केल्याबाबत विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीत नव्हतं."
 
DGCA कडून चौकशीचे आदेश
अगदी दोन-चार दिवसांपूर्वीच DGCA नं आदेश दिले होते की, जे प्रवासी कोव्हिडच्या नियमांचं पालन करणार नाही किंवा मास्क नीट परिधान करणार नाही, त्यांना विमानात प्रवेश देऊ नका. त्यानंतर लगेच ही मदुराईतली ही घटना समोर आल्यानं DGCA काय कारवाई करतं, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.
DGCA नं मदुराईतल्या विमानात लग्नाच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, विमान कंपनीकडे पूर्ण अहवाल मागितला आहे. कोव्हिड नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही DGCA नं दिलाय.
 
दुसरीकडे, विमान कंपनीने कोव्हिड नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये 31 मे 2021 पर्यंत लॉकडॉऊन वाढवण्यात आला आहे.