गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (13:53 IST)

संसदीय पक्ष नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड

modi
आज (7 जून) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे.
 
राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज ही निवड पार पडली.
 
येत्या रविवारी (9जून) नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील अशी घोषणा या बैठकीत करण्यात आली.
 
यावेळी जनता दल युनायटेडचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाचे चिराग पासवान, अनुप्रिया पटेल, जितनराम मांझी असे प्रमुख नेते उपस्थित होते.
 
या बैठकीच्या सुरुवातीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर भाजप नेते राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मनोगत व्यक्त करून संसदीय पक्षाचे नेते म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला मंजुरी दिली.
 
यावेळी टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू म्हणाले की, "मोदीजींच्या रूपाने भारताला योग्य वेळी योग्य नेता मिळाला आहे."
 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचे काम पुढे सरकणार असल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन काम करतील.
 
तर गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, संसदीय पक्षाच्या नेत्यासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव हा देशातील 140 कोटी जनतेचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान मोदींनी पुढील पाच वर्षे देशाचे नेतृत्व करावे, असा हा देशाचा आवाज आहे.